रवींद्र मोराणकर
जळगाव : जळगावकरांचा सहभाग आणि सर्वांचे सहकार्य यामुळे कोविसह सर्व आव्हानांना सामोरे जाताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली, अशी भावना जळगावचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ट्विट करीत जळगावकरांचे आभार मानले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राऊत यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांची नांदेड येथे बदली झाली. यानिमित्ताने त्यांचा निरोप समारंभ झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याबद्दल सदभावना व्यक्त केल्या. त्यांनी सत्कार समारंभात कृतज्ञतादेखील व्यक्त केली.
यानंतर त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करीत जळगावकरांचे आभारही मानले आहेत.
विविध क्षेत्रात योगदान देता आल्याचे समाधान निश्चितपणे सोबत राहील. जळगावसाठी मनात एक खास जागा नेहमीच राहील, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केले तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक
त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सर, तुम्ही आमच्या जिल्ह्याला कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढल्याबद्दल तुमचे व तुमच्या प्रशासनिक टीमचे खूप खूप अभिनंदन.
I am really satisfied that I could contribute in various fields of public service. Jalgaon will always hold a special place in my heart.
विविध क्षेत्रात योगदान देता आल्याचे समाधान निश्चितपणे सोबत राहील. जळगावसाठी मनात एक खास जागा नेहमीच राहील.
धन्यवाद जळगाव!! 2/2 pic.twitter.com/z0OR1BiyaH— Abhijit Rajendra Raut (@abhijitraut10) October 11, 2022
दुसरे नेटकरी म्हणतात, सर, आपल्यासारख्या आयएएस अधिकाऱ्याची महाराष्ट्राला गरज आहे.
एक नेटकरी म्हणतात, कोरोनासारखी गंभीर परिस्थिती अतिशय समर्थपणे हाताळली.
पुढचे नेटकरी नमूद करतात की, जळगाव शहर आणि जिल्ह्याचे नागरिक तुमची कारकीर्द नेहमीच आठवणीत ठेवणार आहे. सर्वात कठीण काळात खंबीरपणे तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण आणले.
आणखी एक नेटकरी जिल्हाधिकारी राऊत यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हणतात की, आमच्यासाठी आपण कायम ऊर्जास्रोत राहिला आहात. आपल्यासारखा मेहनती जिल्हाधिकारी आम्हाला लाभला ही खूप सुदैवाची बाब आहे.
जळगाव जिल्ह्यात केलेल्या कामाची संपूर्ण जिल्हा आपल्याला नेहमीच आठवणीत ठेवील, असेही एक नेटकरी म्हणतात.