ग्राहकाला हवंय काय? बाजार बदलला कसा

तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर टिळक । आर्थिक विषय आयुष्यात अत्यावश्यक असतात हे निर्विवाद. पण ते अनेकांना कंटाळवाणे वाटतात हेही तितकेच खरे! पण आपले आयुष्य शक्य तितके सुखकर करण्यासाठी तर आपण सगळे आयुष्यभर धडपडत असतो. कारण माननीय पंतप्रधानांनी जरी आपल्या राष्ट्रीय अर्थकारणासाठी “आत्मनिर्भर भारत ” ची घोषणा जरी अलिकडच्या काळात ( मार्च २०२० ) केली असली तरी आपल्या सगळ्यांचे ते आणि तसे धोरण पिढीजात आहे. त्यातून कोरोना नंतरच्या काळात बदललेल्या स्थानिक ते जागतिक अर्थकारणाकडे, निदान वरवर तरी, पाहिले तर! असे पाहताना लक्षात येते की मोठ्या शहरांपासून ते अगदी खेड्यापर्यंत जगण्याची – राहण्याची स्थिती – परिस्थिती – वस्तुस्थिती बदललेली आहे. त्यातून उत्पन्नाच्या – गुंतवणुकीच्या संधी बदलत आहेत. अगदी अलीकडेच घडलेली एक घटना सांगतो…. तुमच्यापैकी अनेकांनी तो व्हॉट्सॲप आणि इतर समाज – माध्यमे ( सोशल मीडिया ) यात फिरणारा निरोप ( मेसेजेस ) पाहिला असेल…. वेगवेगळ्या ठिकाणी असणारी अनेक हॉटेल्स अशी विचारणा करत आहेत की त्यांना दररोज लागणाऱ्या पोळ्या ( होय पोळ्या, तंदूरी रोटी नाही ) कोणी करून द्यायला तयार आहे का ? असा प्रकार याआधी शहरांत भाकऱ्या करून घेण्या बाबत होत होता.

विशेषत: मांसाहारी पदार्थ देणाऱ्या हॉटेलांकडून, आणि तीही सुट्ट्यांच्या दिवशी किंवा शनिवारी – रविवारी भाकऱ्यासाठी मागणी असे. आमच्या डोंबिवलीत मांसाहारासाठी, विशेषत: बटर चिकन साठी , प्रसिध्द असणारे एक हॉटेल हॉटेलच्या समोरच्या गावातून गेली कित्येक वर्षे ४००-५०० भाकऱ्या करून घेत आहे. ते काम त्या गावातील दोन – तीन स्त्रिया करत आहेत. या कामातून मिळणाऱ्या पैशातून या अशिक्षित – अर्धशिक्षित स्त्रियांनी कोणतेही कर्ज न काढता तीन – चार रिक्षा विकत घेउन त्या भाड्याने चालवायला दिल्या आहेत. अलिकडच्या काळात ही मागणी भाकऱ्याबरोबरच पोळ्यासाठीही आहे. अगदी दररोज आहे. अनेक हॉटेलांकडून आहे. अगदी छोट्या – छोट्या शहरातल्या हॉटेलकडूनही आहे. कारण पोळी – भाकरी याची मागणी वाढली आहे. कारण कोरोनामुळे आता सगळेच सावध झाले आहेत. आपण दररोज काय खातो आणि ते आपल्या शरीराला आणि खिशाला परवडते का हा विचार बळावत आहे. पुन्हा ही मागणी सर्वदूर आहे. कारण अजूनही अनेकजण ” वर्क फ्रॉम होम ” पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या कामाच्या वेळा पूर्णपणे अनिश्चित , आणि काहीं प्रसंगी अगदी अमानवी आहेत. त्यामुळें घरा- घरातून अशी मागणी आहे. ही मागणी पुरी करण्यासाठी अनेक महिला गट, छोटे हॉल – मालक सरसावले आहेत. ही पुस्तकी चर्चा नाही . आणि ही केवळ पोळ्या – भाकऱ्या यापुरेशी मर्यादीत नाही. डोसे आणि तत्सम आंबवलेले प्रकार दररोज खाण्यापेक्षा आंबोळ्या – धिरडी – थालीपीठ या घरगुती पदार्थांची मागणी वाढत आहे. ही मागणी वय – निरपेक्ष , लिंग – निरपेक्ष , स्थान – निरपेक्ष , उत्पन्न – निरपेक्ष आहे. पोट आणि खिसा या दोन्ही बरोबरच सोय नावाची मोठी गोष्ट त्यात आहे. घरून ऑफीस काम करताना खायला घेतल्यावर ऑफीस कॉल आला तर तो फोन पूर्ण होईपर्यंत एकीकडे डोसा खाता येत नाही आणि फोन पूर्ण झाल्यावर खावा तर तो पूर्णपणे चिवट होतो. या दोन्हीं निकषांवर मराठमोळी घावन व धिरडी सरस ठरतात.

याबाबात एक उदाहरण सांगतो… कोरोनाच्या आधी आमच्या डोंबिवलीतील एक दुकान दिवसाला घावन आणि धिरद्याना लागणारे तांदूळ पीठ दिवसाला जेमतेम १०-१५ किलो विकत होते. आता तेच दुकान हेचं पीठ दिवसाला किमान १०० किलो विकते. उल्हासनगरचा एक सिंधी व्यापारी या दुकानातून दर आठवड्याला कीमान २०० किलो ही पिठे विकत घेतो…. याच मुद्द्याचा अजून एक पैलू. कोरीना आधी छोट्या – मोठ्या शहरातील दैनंदिन वस्तूची खरेदी मॉल्स मधे एकवटत होती. आता अशी खरेदी मोठया प्रमाणावर घराशेजारील कोपऱ्यावरच्या आणि तेही घरपोच वस्तू देणाऱ्या किराणा मालाच्या दुकानात सरकली आहे. असे बदल केवळ खाद्यपदार्थ किंवा पेय यापुरेसे मर्यादीत नाहीत. कोरोना, त्यावरची योग्य – अयोग्य औषधे , त्यांचे अपेक्षित – अनपेक्षित परिणाम , औषध क्षेत्राने त्यात धूऊन घेतलेले हात याचे चटके अनेकांना बसले आहेत. त्यामुळे आता सगळेच मनोमन धास्तावले आहेत. त्यातून धार्मिक – अध्यात्मिक गोष्टींकडे अनेकजण वळले आहेत. याबाबत एक किस्सा सांगतो. दररोजचा मॉर्निंग वॉक संपल्यावर आमच्या सोसायटीच्या बाकावर मी जरा निवांत बसलो होतो. तेंव्हा सहजच मी आमच्या सोसायटीत गेली अनेक वर्षे वॉचमन असणाऱ्या काकांना विचारले की गेल्या काही काळात सोसायटीत येणारी – जाणारी लोक किंवा सोसायटीचे रहिवासी यांच्या येण्या – जाण्याच्या वेळा , सातत्य यात काही फरक झाला आहे का ? त्यावर त्यांनी सांगितलेल्या काहीं गोष्टी गंमतीच्या आहेत. पण त्यातून बदललेला ग्राहक, बदललेला बाजार लक्षांत येतो.

वॉचमन काकांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे आता अनेकजण “वर्क फ्रॉम होम” करत असल्याने रात्री उशीरा सोसायटीच्या आवारात किंवा बाहेर फिरणार्यांची , वॉक घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. वॉचमन काकांनी सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही अनेकजण घरून काम करत असल्यामुळे सोसायटीत येणाऱ्या कुरिअरवाल्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. झोमातो, स्विगी यांच्या प्रतिनिधींची सोसायटीतील आवक – जावक खूप वाढली आहे आणि त्याला आता काळ – वेळाचा धरबंध उरलेला नाही. वॉचमन काकांनी सांगितलेली अजून एक गोष्ट म्हणजे ते म्हणाले…. ” साहेब , आता बरीच घरे हळूहळू आणि काहीं प्रमाणात तरी तुमच्या घरासारखी होऊ लागली आहेत. ” ” म्हणजे? ” ” आपल्या आणि आजूबाजूच्या सोसायटीतील घरांत धार्मिक कार्यक्रम करणाऱ्या गुरुजींचे येणे – जाणे चांगलेच वाढले आहे. ” आमचे वॉचमन काका असे म्हणाले म्हणून त्याच दिवशी आमच्या घरी आलेल्या आमच्या गुरुजींकडे मी याबाबत चौकशी केली असता त्यांनी याला ताबडतोब दुजोरा दिला. इतकेच नाही ; तर आमच्या गुरुजींनी याबाबत आणखी एक वेगळाच पैलू सांगितला. गुरुजींनी असे सांगितले की असे धार्मिक विधि घरी गुरूजी बोलावून करणाऱ्यांचा वयोगट अलिकडच्या काळात झपाट्याने तरुण होत आहे. आणि या मंडळींना केवळ त्यानिमित्ताने नटण्या – मुरडण्यात स्वारस्य नसून त्यांना या विधीत म्हणले जाणाऱ्या मंत्रांचा अर्थ समजून घेण्याची तीव्र ईच्छा असते. ( पुस्तकविक्रीचा पिढीजात व्यवसाय करणाऱ्या माझ्या मित्राने या मुद्द्याला उचलून धरत असे सांगीतले की गेल्या काही वर्षात सगळ्यात जास्त खप जर कोणत्या पुस्तकांचा वाढला असेल तर तो धार्मिक पुस्तकांचा वाढला आहे. मनात आले की हे जर आत्ता होण्याऐवजी आधीच काहीं वर्षे झाले असते तर निदान गीता गोरख प्रेस , गोरखपूर तरी बंद पडले नसते. ) वॉचमन काका आणि आमचे गुरूजी असे म्हणाले म्हणून मी मुद्दामून गेली २५-३० वर्षे ज्यांच्याकडून मी दररोजची आणि मोठ्या पुजेसाठीही मी फुले घेतो त्याच्याकडे चौकशी केली असता अशा पूजांसाठीच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि त्यात सातत्य आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यंदा आमच्या डोंबिवलीच्या गणेश मंदिरात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पासून देवदर्शनाला लागलेल्या रांगा आणि त्यात ७५ टक्क्यांहून जास्त असणारे तरुणाईचे प्रमाण हे दुसरे कसले उदाहरण आहे ? या मुद्द्यावर आमच्या गुरुजींशी चर्चा करत असतानाच त्यांनी या बदलत्या क्षेत्राचा आणखीन एक पैलू सांगितला. तो म्हणजे या क्षेत्राचे सातत्य व प्रमाण वाढण्यात तरुण मंडळीचे प्रमाण खूप आहे. त्यांना असे कार्यक्रम करण्याची खूप मनापासून ईच्छा आहे. त्यासाठी हौसेने पैसा खर्च करण्याचीही त्यांची तयारी आहे. पण त्याबाबतची पूर्व – तयारी करण्या एवढी त्यांना त्याबाबत माहिती नाहीये आणि वेळही नाहीये. घरांत असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना यासाठी वेळ आणि माहिती असली तरी ते वयोमानानुसार ती उठबस करु शकतीलच असे नाहीये. त्यामुळे एखाद्या ” टर्न की प्रोजेक्ट ” सारखे अशा विधी साठी बोलावलेल्या गुरुजींनाच ते येताना पूर्ण तयारी घेउन यायला सांगितले जात आहे आणि दक्षिणा देतानाच दक्षिणा व्यतिरिक्त अशा तयारीचे पूर्ण पैसे दिले जात आहेत.. वेळप्रसंगी पूजेच्या आदल्या दिवशीच आणि तेही गुगल पे , फोन पे सारख्या ऑनलाईन माध्यमातून. या मुद्द्याचा अजून एक पैलू लक्षात घेण्याजोगा आहे. आता धार्मिक विधी करणाऱया तरुण पिढीचा दृष्टिकोन आधीच्या काळातील , आधीच्या पिढीच्या भूमिके पेक्षा वेगळा आहे. प्रत्येक विधी मागचे शास्त्र – तंत्र – मंत्र समजून घ्यायची , निदान त्याबाबत पूजेच्या आधी किंवा नंतर चहापान करतांना पुरोहित – गुरुजींना बोलते करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आधीसारखे ” देई वाणी , घेई प्राणी ” प्रकार उरलेला नाही. आणि आता ही चर्चा निव्वळ मराठीतून करून भागत नाही ! ही सगळी चर्चा होत होती म्हणून या क्षेत्रांत अजून काय काय बदल झाले आहेत असा मी मनोमन विचार करायला लागलो तेंव्हां जाणवले की नैवेद्य – प्रसाद यासाठी पेढे – मोदक – मिठाई यांचा उपयोग अजूनही होतो आहे; पण त्याचबरोबर फळं – सुकामेवा – खडीसाखर यांचे नैवेद्य दाखवण्याचे प्रमाण वाढते आहे. बाजार बदलतो आहे; कारण ग्राहक बदलतो आहे. याची अजून दोन उत्कृष्ट उदाहरणें सांगतो. घरात धार्मिक विधी आहे म्हणून पूजेत आणि दाराला लावायला आंब्याचा टहाळा नेहमीच आणला जातो. आता तर याचे प्रमाण आणि सातत्य वाढले आहे. आता बाजारात टहाळा विकत आणायला गेलो तर ” पंचपत्री ” ची जुडीही मिळू लागली आहे. देवासमोर पाच विडे आणि त्यावर ठेवायला ५ फळं प्रत्येकच पूजेत लागतात. धार्मिक विधींचे वाढते प्रमाण लक्षात घेउन आता बाजारात ५ फळे आणि २५ विड्याची डेखासकट पाने अशी पुरचुंडी एकत्रच विकत मिळू लागली आहे. अगदी काल जागतिक पारायण दिन होता…. ह. भ. प. श्री दासगणू महाराज विरचित ” श्री गजानन विजय ” ( गजानन महाराज पोथी )… अनेकजण या ग्रंथाचे पारायण केल्यावर गुळाची छोटी ढेप ” शेरणी ” म्हणून प्रसाद म्हणून देतात.

गेले आठवडाभर अनेक दुकानांत व्यापारी ग्राहकांना आपणहून सांगत होते.. ” गुळाच्या ढेपी बरोबरच गहू आणि धने ही दिले जातात. ” काहीं दुकानांत तर पाव किलो गुळाची ढेप – पाव किलो गहू – पाव किलो धने असे एकत्र पुडी करून ठेवले होते. आणि त्याला मागणी होती. अर्थातच हे काही श्रद्धेय श्री गजानन महाराज किंवा श्री दासगणू महाराज सांगतं नाहीत. हे बदलता ग्राहक – बदलता बाजार याचे उदाहरण आहे. असाच अनुभव चातुर्मासात , विशेषत: श्रावणात , भाजी बाजारात येत होता का ? या काळात अनेक घरी ५ पालेभाज्या खायचा प्रघात आहे. ५ वेगवेगळ्या पालेभाज्यांच्या ५ वेगवेगळ्या जुड्या एकावेळी घेउन त्या संपवणे कठीण आहे. यावर्षी भाजीबाजारात भाजीवाले ५ वेगवेगळ्या पालेभाज्या थोड – थोड्या घेउन त्याची एक जुडी विकत होते… कसले भन्नाट Customisation आहे हे ! कोरोनाचे दुष्परिणाम नक्कीच आहेत. पण त्याचे असे फायदेही आहेत. आपण या संधीचा फायदा कधी आणि कसा घेणार हा मुद्दा आहे. आता बाजार बदलला म्हणून ग्राहक बदलला की आता ग्राहक बदलला म्हणून बाजार बदलला की दोघे बदलले म्हणून दोघेही बदलले हे ज्याचे त्याने ठरवावे हे उत्तम!