नवी दिल्ली : सध्या देशात ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’ द्वारे सायबर ठग सहजपणे लोकांना आपला बळी बनवत आहे. सध्याच्या काळात ‘डिजिटल अरेस्ट’ हा चिंतेचा विषय बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 115 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना सांगितले.
डिजिटल अरेस्ट हा एक सायबर फ्रॉडचा नवा प्रकार आहे. यात सायबर ठग आपल्याला पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम किंवा इन्कम टॅक्स वा अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत पीडीत व्यक्तीला कॉल करतात. नंतर त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबियांवर अनैतिक कामात सामील असल्याचा आरोप करतात. त्यानंतर फ्रॉड करणारे व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करतात. साधा कॉल अथवा व्हिडीओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. नंतर पीडीत व्यक्तीला खोटी कागदपत्रे दाखवून किंवा खोटे ओळखपत्र दाखवून घाबरवले जाते. त्यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव टाकला जातो.
केव्हा कोणीही अशा प्रकारचे फोन करतील, तेव्हा त्याला सर्व माहिती सांगण्याआधी काही वेळ थांबायचे. कोणतीही सरकारी संस्था फोनवर माहिती विचारत नाही, या संस्थांकडून डिजिटल अरेस्टच्या धमक्या दिल्या जात नाहीत, हे सर्वप्रथम लक्षात ठेवायचे. यानंतर फसवणुकीपासून वाचण्यासाठी राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर दूरध्वनी द्वारे संपर्क करायचा, असे मोदी यांनी नमूद केले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, दिवाळीनिमित्त ज्या काही वस्तू खरेदी कराल, त्या ‘मेक इन इंडिया’ असतील, याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. सरदार पटेल यांचा 150 वा जयंती उत्सव 31 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे तर भगवान बिरसा मुंडा यांचा 150 वा जयंती उत्सव येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. दोन्ही महापुरुषांसमोर वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने होती, मात्र देशाची एकता हेच या दोघांचे ध्येय होते, असे मोदी यांनी सांगितले.
कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवरून अशा धमक्या देत नाही
पंतप्रधान म्हणाले की फसवणूक करणारे पोलिस, सीबीआय, नार्कोटिक्स आणि कधीकधी आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवतात. अशी वेगवेगळी नावे वापरून ते तुमच्याशी बनावट अधिकारी म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात. अनेकदा लोक त्यांच्या फंदात पडतात. सायबर घोटाळ्यांविरोधातील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. ‘मन की बात’मध्ये पीएम मोदींनी शाळा आणि महाविद्यालयांना याबाबत जनजागृती मोहीम राबवण्याचे आवाहनही केले.