Human Rights Day : काय आहे मानवाधिकार दिवस, का साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास

#image_title

Human Rights Day :  जगभरात आज, १० डिसेंबर २०२४ रोजी मानवाधिकार दिवस साजरा केला जात आहे. पण हा मानवाधिकार दिवस का साजरा केला जातो, हे तुम्हाला माहितीय का ? मग जाणून घेऊयात या संदर्भात…

का साजरा केला जातो मानवाधिकार दिवस ?

जगभरात, १० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो, यामागील उद्दिष्ट म्हणजे जगभरातील नागरिकांमध्ये मानवाधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करणे. १९५० साली संयुक्त राष्ट्रसंघटनेने हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू केली.

ही तारीख का निवडली ?

ही तारीख निवडण्यामागे एक महत्त्वाचं ऐतिहासिक कारण आहे, १० डिसेंबर १९४८ रोजी मानवाधिकारांची सार्वत्रिक जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली होती. या जाहीरनाम्याने मानवाधिकारांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एक जागतिक मानक निर्माण केला.

विशेष म्हणजे, हे जाहीरनामा ५०० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित असून, हे आजही जगभरातील सर्वाधिक भाषांमध्ये अनुवादीत कागदपत्र आहे. या दिवशी विविध देशांत मानवाधिकारांबाबत जनजागृती कार्यक्रम, चर्चासत्रे आणि इतर उपक्रम आयोजित करून हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

मानवी हक्क दिनाचा इतिहास  

मानवी हक्कांचा इतिहास हा मानवी सभ्यतेच्या प्रगतीचा आरसा आहे, ज्यामध्ये सायरस द ग्रेटच्या काळातील 539 ईसा पूर्वपासूनचा महत्त्वाचा टप्पा पाहायला मिळतो. सायरसने बॅबिलोन जिंकल्यानंतर केलेल्या क्रांतिकारी निर्णयांनी मानवी हक्कांची सुरुवात केली. त्याने गुलामांना मुक्त केले, धार्मिक स्वातंत्र्य दिले, आणि वांशिक समानतेची घोषणा केली. या तत्त्वांचा उल्लेख सायरस सिलेंडर या ऐतिहासिक वस्तूत आढळतो, ज्याला मानवी हक्कांच्या सार्वभौमिक घोषणेच्या प्रेरणास्थानांपैकी एक मानले जाते.

त्यानंतर 1215 मध्ये मॅग्ना चार्टाने मानवी हक्कांच्या प्रगतीसाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मॅग्ना चार्टाने “कायद्याचे राज्य” ही संकल्पना मांडली, ज्यामुळे व्यक्तींना विशिष्ट हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले. या दस्तावेजाने व्यक्तींना अनियंत्रित खटला व तुरुंगवासापासून संरक्षण देण्याचा अधिकार प्रदान केला.

या घटनांनी मानवतेला हक्क, स्वातंत्र्य आणि न्यायाची मूलभूत संकल्पना समजावून दिली, जी आजच्या आधुनिक लोकशाही व्यवस्थेचा आधार आहे.