---Advertisement---

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात काय आहे खास? जाणून घ्या

by team
---Advertisement---

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा ११ वा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि म्हटले की, केंद्रीय अर्थसंकल्पात दिलेल्या सवलतीबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

“एफडीआयमध्ये महाराष्ट्र क्रमांक-१”

अजित पवार म्हणाले की, देशात थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. दावोसमध्ये महाराष्ट्राने ५६ कंपन्यांसोबत १५.७२ लाख कोटी रुपयांचे करार केले, ज्यामुळे १६ लाख लोकांना रोजगार मिळेल. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे योगदान १५.४% आहे.

अर्थमंत्र्यांनी पुढे माहिती दिली की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) महाराष्ट्राचे विकास केंद्र बनविण्यासाठी सात व्यवसाय केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. या केंद्रांद्वारे महाराष्ट्राला व्यवसाय आणि औद्योगिक दृष्टिकोनातून अधिक सक्षम केले जाईल.

24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट


दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट आहे.

लेक लाडकी योजनेसाठी 50 कोटी 55 लाख प्रस्तावित


लेक लाडकी योजनेअंतर्गत 1 लाख 13 हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता 50 कोटी 55 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

लॉजिस्टिक्स पॉलिसी-२०२४ जाहीर

अर्थमंत्री अजित यांनी विधानसभेत सांगितले की, राज्याचे ‘लॉजिस्टिक्स पॉलिसी-२०२४’ जाहीर करण्यात आले आहे, ज्याद्वारे १० हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्रात समर्पित लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रोत्साहन आणि सुविधांमुळे सुमारे ५ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी केंद्र


पुढे बोलताना मुंबईत सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली. ”मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे “ग्रोथ हब” म्हणून विकसित करणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार-बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण करणार आहे, असे ते म्हणाले.

५,५६,३७९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात झाली

अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले की, २०२३-२४ या वर्षात एकूण ५,५६,३७९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात झाली. २०२४-२५ या वर्षात नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकूण ३,५८,४३९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात झाली.

अर्थव्यवस्थेबद्दल काय म्हणाले?

अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले की अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी चार प्रमुख घटक वाढवणे आवश्यक आहे. खाजगी आणि सरकारी गुंतवणूक, ग्राहक खर्च आणि निर्यात. ते म्हणाले, “पायाभूत सुविधांमध्ये सरकारची गुंतवणूक आणि उद्योगांना देण्यात येणाऱ्या विविध प्रोत्साहनांमुळे मोठ्या प्रमाणात थेट देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे.

खाजगी गुंतवणूक उत्पादन, रोजगार आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ करत आहे. याशिवाय, विविध सरकारी योजनांचे फायदे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने खरेदी शक्ती वाढली आहे. यामुळे बाजारात वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, गुंतवणूक-रोजगार निर्मिती-उत्पन्नात वाढ-मागणी-गुंतवणूकीचे विकास चक्र सुरूच राहील.”

अजित पवार म्हणाले, सन 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र व्हावे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे. विकसित भारत तयार करण्यासाठी आम्ही राज्यातील शाश्वत कामे हाती घेतली आहे. आम्ही कृषी आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment