जळगाव : जिल्ह्यात 12 बाजारसमित्यांसाठी आज शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र यात काही ठिकाणी निवडणूकीत झालेल्या गोंधळाने निवडणूकीला गालबोट लागले. जळगाव बाजार समितीसाठी नुतन मराठा महाविद्यालय येथील मतदार केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला. तसेच चाळीसगाव येथे मतदान केंद्रात उमेदवारांनी प्रवेश केल्याच्या कारणावरून भाजपा-शिंदे गट (शिवसेना) व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. जिल्ह्यात बाजार समितीसाठी दुपारपर्यंत सरासरी 70 टक्के मतदान झाले तर संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 95 टक्कयापेक्षा अधिक मतदान झाले.
मतदान प्रक्रिया कधी?
जिल्ह्यात 12 बाजार समित्यांमध्ये 215 जागांसाठी 510 उमेदवार रिंगणात आहे. त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. जिल्ह्यात जळगाव 87 टक्के, अमळनेर 98, पाचोरा 98, बोदवड 94, यावल 93 धरणगाव 89 आणि भुसावळ 98, रावेर 98, चोपडा 98, चाळीसगाव 99, पारोळा 97, जामनेर 96 टक्के या 12 बाजार समितीसाठी 28 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यात चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक 99 टक्के मतदान झाले.
एकाच दिवशी मतदान झाले असले तरी मतमोजणी मात्र दोन टप्प्यात होणार आहे. यात 29 एप्रिल रोजी भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा,जामनेर या 6 बाजार समितीची मतमोजणी होणार आहे. 30 एप्रिल रोजी जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या 6 बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे.