Ladki Bahin Yojana : जालना येथे राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयी भाष्य केलं आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे, त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण ही योजना गरजवंत महिलांसाठी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
जानेवारीचा हप्ता कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना या योजनेच्या लाभार्थ्यांना चाळण लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचवेळी लाभार्थी महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, काळजी करू नका. या योजनेचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, त्यांच्याबाबत वेगळा विचार होणार आहे.
लाडकी बहीण योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचे काम महिला आणि बालविकास विभागाने केले आहे. दोन दिवसांपूर्वी या योजनेसाठी ३ हजार ७०० कोटींचा धनादेश महिला आणि बालविकास खात्याकडे देण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात सहा महिन्यांचे हप्ते जमा करण्यात आले आहेत. २६ जानेवारीच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हाप्ता जमा होईल. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.