तेव्हा कुठे जाते मराठी अस्मिता ?

---Advertisement---

 

१० वर्षांपूर्वर्वीच दिवस आठवा. विधानसभा अधिवेशनासाठी मायबाप सरकार नागपुरात येई तेव्हा त्याचे स्वागत कसे होत असे?
कडकडीत ‘विदर्भ बंद’चे आवाहन केले जात असे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा लाखालाखांचा मोर्चा विधानसभेवर येत असे. पोलिसांना लाठीमार करावा लागे. प्रसंगी अश्रुधूरही. विदर्भाचा बॅकलॉग कसा वाढतोय हे विरोधी नेते हिरीरीने सांगत. जांबुवंतराव धोटे मैदानात असेपर्यंत विदर्भ राज्यासाठीचे आंदोलन जोरात होते. नंतरचे नेते हा दबाव टिकवू शकले नाहीत. विदर्भवादी संपले अशातला भाग नाही. विदर्भाचा संपूर्ण विकास झाला अशीही परिस्थिती नाही. तरीही विदर्भ राज्याचा आवाज कुठेतरी क्षीण झाला आहे. याला कारण आहे. वेगळे राज्य घेऊन जे मिळायचे ते महाराष्ट्रात राहून मिळत असेल तर फुटून निघण्याची भाषा का करायची? असा व्यवहारी विचार विदर्भाची जनता करू लागली आहे.

लोकांना विकास हवा आहे. भाजपा आणि महायुतीचे सरकार तो देत आहे. वेगळ्या राज्याची मागणी देशभर आहे. आज ना उद्या केंद्र सरकारला झुकावे लागेल. काही नवी राज्ये द्यावी लागतील. तेव्हा विदर्भ राज्य मिळाले तर विदर्भाच्या जनतेला आनंदच होईल. पण आज त्यासाठी रस्त्यावर यायची जनतेची मानसिकता नाही. नागपूर अधिवेशनानिमित्ताने सरकार नागपुरात मुक्कामाने असताना हेच चित्र पाहायला मिळते. २०१४ पूर्वीचा विदर्भ आठवा आणि आताच विदर्भ पहा. खूप काही बदलले आहे. पूर्वी नागपुरात काही घडत नसे. अधिवेशनापुरतं नागपूर जागत असे. अधिवेशन संपलं की ११ महिने नागपूर झोपून जात असे. आज नागपूर २४ तास जागं असताना दिसते आहे. मोठमोठ्या संस्था इथे आल्या आहेत. पुण्याच्या आधी नागपुरात मेट्रो रेल्वे आली. लहान-मोठे उद्योग आले. नागपूर झपाट्याने बदलतं आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. मुंबईत नवे विमानतळ आले, कोस्टल रोड झाला, मेट्रो ३ धावू लागली. केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला होत आहे. विकासाचे प्रकल्प फटाफट मोकळे केले जात आहेत. राजकारण हा पार्टटाईम जॉब नाही, हे फडणवीसांनी छान ओळखलं आहे. त्यांची १८-१८ तासांची मेहनत आणि कामाचा झपाटा चकित करणारा आहे. त्यामुळेच तर आजच्या कुरघोडीच्या राजकारणात फडणवीस रिझल्ट देऊ शकले. बदलांची दिशा ओळखून फडणवीस निर्णय करीत आहेत. येत्या १० वर्षांत महाराष्ट्र देशातले मोठे आर्थिक केंद्र झालेला दिसेल.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न आहे, असे मी नेहमी म्हणतो. व्हिजनरी नेता मिळाला तर तो काय चमत्कार करू शकतो ते आपण फडणवीस यांच्या रूपात पाहतो आहे. त्यांनी तिसन्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्या गोष्टीला आता वर्ष झालं. २०१५ मध्ये ‘अधिकारी ऐकत नाहीत’ म्हणणारे फडणवीस आज ‘ऐकावंच लागेल’ असे म्हणतात. हा मोठा बदल आहे. आल्या आल्या १०० दिवसांचा कार्यक्रम देऊन फडणवीसांनी अधिकारी आणि मंत्र्यांना कामाला लावले. वर्षानुवर्षे कुण्या मंत्र्याचे पीए किंवा कुठल्या खात्यात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खात्यात परत पाठवताना त्यांच्यातल्या कणखर मुख्यमंत्र्यांचे दर्शन झाले. आजवर कुण्याही मुख्यमंत्र्याने वाटली नसेल एवढी वैद्यकीय मदत त्यांनी गरजू रुग्णांना वाटली. मागेल त्याला सौर पंप या त्यांच्या योजनेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सला दखल घ्यावीशी वाटली. शांत, संयमी, मितभाषी, कठीण परिस्थितीत न डगमगणारा, डोक्याचा वापर करणारा हा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राचा ब्रँड झाला आहे. ते सहसा कोणाच्या वाटेल जात नाहीत. पण अंगावर आलेल्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाहीत. महाराष्ट्राचे राजकारण कित्येक वर्षे शरद पवार यांच्याभोवती फिरत होते. फडणवीसांनी हे चक्र उलटे केले. राजकारणात फडणवीस यांनी केलेल्या तोडफोडीमुळे तर त्यांना ‘चाणक्य’ म्हटले जाते. फडणवीस समोरच्याचा विश्वास कमावतात. पण विश्वासघात करणाऱ्याला सोडत नाहीत. २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून लढवली. जनतेने या युतीला बहुमताचा कौल दिला. मात्र, निकालानंतर उद्धव ठाकरे यांची नियत फिरली. मुख्यमंत्री होण्याच्या स्वार्धापायी त्यांनी भाजपाला दगा दिला. शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. अवघ्या अडीच वर्षांतच फडणवीसांनी याचा बदला घेतला. ठाकरेंची शिवसेनाच फोडली. नंतर अजित पवारांना कामाला लावले, शरद पवारांची माणसं फुटत नाहीत असा सर्वसाधारण समज होता. फडणवीसांनी अजितदादांना फोडले. काकाला एकदम रिकामं केलं. दोन-दोन पक्ष फोडून विरोधकांना थंड करणारे फडणवीस यांना आज महाराष्ट्राने ‘देवाभाऊ’ म्हणत डोक्यावर घेतले आहे. एकाच वेळी आपण काय काय करू शकतो, ते देवाभाऊने दाखवले. तीन पक्षांची महायुती नावाची सर्कस देवाभाऊ लीलया सांभाळत आहेत. मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यात अबोला आहे अशी चर्चा रंगली होती. दोघात संवाद नाही असे मीडिया दाखवत होता. पण शिंदे यांनीच तो खोटा प्रचार हाणून पाडला. ‘बॉलिवूडमध्ये बिग बी’ आहे. आमच्याकडे ‘बिग डी’ आहे, अशा शब्दात शिंदेंनी देवाभाऊंचे वर्णन केले.ज्याच्याशी खटकलं त्याच्याबाबतीत कुणी या प्रकारे बोलू शकतो? देवाभाऊंना माणसं जिंकण्याची कला छान अवगत आहे. देवाभाऊंना माणसं हाताळता येतात. ते त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येते. उद्धव ठाकरे देवाभाऊंना टोमणा मारण्याची एकही संधी सोडत नाहीत. म्हणून देवाभाऊने त्यांच्याशी कसे वागावे? बाळासाहेव ठाकरे यांचे मुंबईत स्मारक होत आहे. त्या स्मारक समितीचा अध्यक्ष देण्याचा विषय आला तेव्हा देवाभाऊने उद्धव ठाकरे यांचे नाव ओक्के केले. प्रतिस्पर्ध्याला जिंकण्यासाठी आणखी काय करायचे असते? ‘सारे विरोधी पक्ष देवाभाऊच चालवतात’ असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले होते. त्यांचे काय चुकले?

नागपुरात सध्या भरलेल्या विधानसभा अधिवेशनाचे एक विशेष आहे. विरोधी नेत्याशिवाय हे अधिवेशन पार पडत आहे. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहाला विरोधी नेता नाही. विधान परिषदेत अंबादास दानवे होते. पण त्यांची आमदारकी संपली. आता विरोधी नेताच नाही असे हे पहिल्यांदाच घडते आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश आले. मात्र विधानसभा निवडणुकीत वडणुकीत सुपर सुपडा साफ झाला. त्या धक्क्यातून विरोधकांना अजून सावरणं जमलेले नाही. विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेचे २० आमदार निवडून आले. काँग्रेसचे १६ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त १०. तिघे मिळूनही ४६ आमदार होतात. आता सभागृहातले विरोधी पक्षनेतेपद मिवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरू आहे. पण कसे मिळणार? त्यासाठी सभागृहाच्या सदस्य संख्येच्या किमान १० टक्के आमदार पाहिजेत. महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षाकडे २९ आमदार नाहीत. तरीही विरोधकांचा आग्रह चालू आहे. कुठली अट लागत नाही, असा विरोधकांचा दावा आहे. पण १० टक्के खासदार नसल्याने लोकसभेच्या पहिल्या तीन निवडणुकीत कोणालाही विरोधी पक्षनेतेपद मिळालं नव्हतं, हे ते सोयीस्करपणे विसरतात. सध्या साऱ्यांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेली २५ वर्षे मुंबईचे महापौरपद शिवसेनेकडे होते. यावेळी काट्याची टक्कर आहे. भाजपाला आपला महापौर बसवायचा आहे. निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. मराठी अस्मितेचा विषय काढत ठाकरेंनी वातावरण तापवलं आहे. त्यासाठी आपला चुलतभाऊ मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांना सोबतीला घेतले आहे. अडचणीची वेळ आहे म्हणून ठाकरेंना मराठी आठवली. पण राजकारण खेळायचे असते तेव्हा मराठीचे काय होते?

राज्यसभेत पाठवायचं होतं तेव्हा ठाकरेंनी कोणा कोणाला पाठवलं? तेव्हा त्यांना चंद्रिका केनिया, प्रीतिश नंदी, वेणुगोपाल धूत आठवले? आजच्या घडीला प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य आहेत. मोक्याच्या वेळी कुठे गायब होते तुमची मराठी अस्मिता? महापालिका निवडणुकीत मराठी माणूस हा प्रश्न नक्कीच विचारणार आहे.

मोरेश्वर बडगे, ज्येष्ठ पत्रकार
९८५०३०४१२३

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---