---Advertisement---

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती….!

---Advertisement---

चंद्रशेखर जोशी

राजकारणाची समीकरणे कधी बदलतील याची आता शाश्वती राहिलेली नाही. पूर्वीचे कार्यकर्ते जेव्हा भेटतात तेव्हा काय राजकारण होते यांच्या काळात… ते ऐकून धक्का बसतो… घरच्या भाकरी बांधून पक्ष बांधणी, तत्त्व आणि विचारांशी बांधिलकी ठेवत ही मंडळी काम करत असे. काहींनी जवळचा पैसा पक्ष कार्यासाठी खर्च केला. आपला फायदा काय? याचा साधा विचारही या मंडळींना शिवला नाही. देशात, राज्यात अनेक पक्ष वाढले, सत्तेतही आले. त्यामागे या मंडळींच्या संघर्षाचे मोठे योगदान आहे. काँग्रेस पक्ष अगदी स्वातंत्र्यापासून सत्तेला चिकटून होता… पण हळूहळू हवा बदलत गेली. लोकांची मानसिकताही बदलली.

आज या पक्षाची परिस्थिती काय आहे? पक्षातील नेत्यांमधील अहंकारातून काही नवीन पक्षांचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. हीच परिस्थिती शिवसेनेची झाली. प्रथम राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना मनसेची निर्मिती केली. भुजबळ आणि नारायण राणे यांनीही या पक्षाला खिंडार पाडले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात या पक्षाची आणखीनच वाताहत झाली. पक्षातील बडे नेते मोठ्या प्रमाणात बाहेर पडले… दोन-अडीच वर्षांपूर्वी तर मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील दिग्गज मंडळी बाहेर पडली… एक वेळ अशी चर्चा रंगली की, केवळ बाप उद्धव व चिरंजीव आदित्य ठाकरे दोघेच पक्षात शिल्लक रहातात की काय? अशी स्थिती होती.

अळी मिळी गुप चिळी

जिल्हा पातळीवर पक्ष वाढीचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करतोय… आणि यात वावगे काहीच नाही. मात्र कोण कोणत्या उद्देशाने पक्षात येतोय किमान हे तर तपासा बाबांनो… दुर्दैव म्हणजे या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणताच पक्ष विचार करीत नाही किंवा तसा प्रयत्नही दिसत नाही. कोणी जेलमध्ये जाऊन आलेय तर कोणी विविध कारणांनी बदनाम… काहींची भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी सुरू आहे. तेदेखील पक्ष बदलात आघाडीवर… शक्ती वाढतेय मग कुणालाही येऊ द्या… असे समीकरण राजकीय क्षेत्रात दिसते आहे.

यात जळगाव जिल्हा मागे आहे असे नाही… ‘अळी मिळी गुप चिळी’ ‘आपले रहस्य… ‘रहस्य’ या शब्दातच मुळी अनेक गोष्टी सामावलेल्या असतात. हे रहस्य उघड होऊ नये, त्याचा बोभाटा होऊ नये म्हणून अनेकांनी सत्तापक्षात उड्या घेतल्या. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील भरतीप्रक्रियेतून हे लक्षात येते. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे…. नेत्यांची सोय विधानसभा निवडणुकीत झाली… कार्यकत्यांचे काय? या प्रश्नाने कार्यकर्त्यांत खदखद वाढू लागली… पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगर पालिका, नगर परिषदा अशा सर्वच क्षेत्रात निवडणुकीची प्रतीक्षा आहे. हे बिगुल फुंकण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षात गेल्यावर कशा संधी मिळतील याचे आडाखे बांधण्यात दुसऱ्या फळीतील नेते मंडळी लागली आहे.

पदरी पडले पवित्र झाले

माजी राज्यमंत्री देवकर आप्पा, डॉ. सतीश आण्णा पाटील काकांकडून पुतण्याकडे आले… त्यांनी केवळ या दरवाजातून निघून त्या दरवाजाने प्रवेश केला… काकांच्या हातात आता काहीच नाही. बरोबर हेच हेरून व भविष्यातील चौकशा, कारवाया नको रे भो… असे म्हणत कोलांटउडी घेणाऱ्यांपैकी ही मंडळी आहेत. पक्ष वाढतोय ना? पदरी पडले पवित्र झाले, अशी त्या पक्ष संघटनेची भूमिका. मात्र वर्षानुवर्षे काकांसोबत रहाणाऱ्या कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे.

विचारांपेक्षा फायद्याचा विचार करणारे कार्यकर्ते आण्णा, आप्पांसोबत गेलेही. पण जे विचार करणारे आहेत… त्यांना प्रश्न पडलाय, कोणता झेंडा घेऊ हाती?… वर्षानुवर्षे तत्त्वांसाठी लढलो, काही विचारांना विरोध केला, व्यक्तींना विरोध केला, त्यांच्या मांडीलामांडी लावून बसायचे कसे? उजवी आणि डावी विचारसरणी..? यांचा मेळ बसेल कसा? मात्र असा विचार करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे…. आगामी काळात हेच चित्र अन्य पक्षातही दिसणार आहे… हेदेखील तेवढेच खरे…!

काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता

जनकल्याणासाठी, लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, काही मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य पातळीवर जिल्ह्यातील शक्ती कमी पडत असेल तर सत्तारूढ पक्षात जाणाऱ्यांचे स्वागत, कौतुक करायलाच हवे. पण अशा पक्ष बदलात नेहमीच सत्ता महत्त्वाची ठरते. सत्ता भल्या भल्यांना नमवते. सत्तेची काडी कुठली कळ दाबेल आणि धनाढ्यांचीही काय वाताहत करेल, हे सांगता येत नाही.

परिणामी डुबणाऱ्या जहाजातून उडी घेऊन प्राण रक्षणार्थ अर्थात सत्ता प्राप्तीसाठी होडीत बसायलाही लोक तयार होतात. तसे राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. हे सांगायचे कारण की, फोडाफोडीच्या या राजकारणाचे पडसाद आता आपल्या जिल्हा पातळीवर उमटू लागले आहेत. या धामधुमीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मात्र भंबेरी उडत असल्याचे लक्षात येतेय. अगदी ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ असा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला आहे.

बारामतीतील काका-पुतण्याचे पक्ष फोडाफोडीचेही असेच परिणाम प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत. हिंदुत्ववादी विचारांनी एकनाथ शिंदेंना स्वीकारले पण अजित पवार जेव्हा युतीत आले, त्या वेळी बहुतेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. पवार अन् हिंदुत्व.. S..S काय संबंध? असे पुटपुटणे काही काळ सुरू होते. इतकेच काय तर पवार, मग ते कोणतेही असो… ते नकोतच अशा प्रतिक्रियाही उमटल्या आणि आजही तशीच काहीशी परिस्थिती आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment