---Advertisement---
दीपक महाले, कृष्णराज पाटील
शहराचा चौफेर विस्तार दिवसागणिक वाढत असून, विकासही कासव गतीने होत आहे. मात्र, शहरातील मुख्य चौकांसह रस्त्यांवर तसेच समांतर रस्त्यांवर विविध पथ विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी अर्धेअधिक रस्तेच गिळंकृत केले आहेत. परिणामी वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे. विशेषतः टॉवर चौक, बेंडाळे चौक, नेरी नाका, अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक, व्यापारी संकुल यांसारख्या प्रमुख चौकांमध्ये, जिथे अतिक्रमणे आणि वाहनांची वाढती संख्या यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय, छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. या गंभीर समस्यांकडे महापालिका, पोलीस प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
सध्या महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाने वेग घेतला आहे. त्यातच महापालिका प्रशासन निवडणुकीच्या कामांत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने निवडणुकीचे काम करताना, शहरातील समस्यांकडे लक्ष देणे अपेक्षित असताना, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. निवडणुका तर होतच असतात. मात्र, महापालिका प्रशासनाने निवडणुकीचे काम करताना, नागरी समस्यांकडेही लक्ष देणे अपेक्षित असल्याची जळगावकरांची भावना आहे. मात्र, महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबत अधिक रस दिसून येत असल्याचे दिसून येत आहे.
ध्वनी-वायुप्रदूषणाचा स्तर वाढता
शहरासह विविध उपनगरांतील रस्ते अर्धेअधिक विविध गृहोपयोगी वस्तूंसह भाजीपाला, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांसह तीनचाकी वाहनांनी व्यापले गेले आहेत. शिवाय, भाजीपाला व फळ विक्रेते थेट रस्त्यावरच पथारी मांडून बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीमध्येच रस दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे विक्रेत्यांनी अर्धेअधिक रस्ते गिळंकृत केल्याने वाहतूक कोंडी होऊन, हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजांनी व धुरामुळे प्रदूषणही वाढल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक प्रशासनाचा कानाडोळा
शहरात वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः टॉवर चौक, बेंडाळे चौक, नेरी नाका, अजिंठा चौफुली, घाणेकर चौक, यांसारख्या प्रमुख चौकांसह व्यापारी संकुल रस्त्यांवर अतिक्रमणे आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यावर तोडगा म्हणून प्रस्तावित रिंग रोड आणि नुकताच सुरू झालेला तरसोद- पाळधी बाह्यवळण रस्ता यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. यामुळे काही प्रमाणात अवजड वाहतूक बाह्यवळण मार्गावर वळली असली, तरी अपघातांचे सत्र कमी झालेले नाही. तसेच शहरातील मुख्य व उपरस्त्यांवर विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक पोलिसांच्या देखरेखीअभावी समस्या आहे तशाच कायम आहेत.
या भागांत विक्रेत्यांची सर्वाधिक अतिक्रमणे
शहरातील मध्यवर्ती भागातील महात्मा फुले व्यापारी संकुल ते महात्मा गांधी व्यापारी संकुलासमोरील रस्ते, जुने बसस्थानक ते चित्रा चौक, टॉवर चौक ते नेहरू पुतळा चौक, रेल्वेस्थानक रस्ता, टॉवर चौक ते जिल्हा परिषद, शिवाजीनगर उड्डाणपूल ते रेल्वेस्थानक पोलीस चौकी, नेहरू पुतळा ते गोविंदा रिक्षाथांबा, कोर्ट चौक परिसर, भिलपुरा चौक, शनिपेठ, जिल्हापेठ परिसर, कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्ता, कोर्ट चौक ते नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी चौक, महाबळ रस्ता, काव्यरत्नावली चौक, भाऊंचे उद्यान, महामार्गावरील महाराणा प्रताप पुतळा चौक, बहिणाबाई उद्यान, स्वातंत्र्य चौक ते पांडे चौक, बीएसएनएल, घाणेकर चौक, सुभाष चौक, नेरी नाका परिसर, अजिंठा चौफुली, कालिंकामाता मंदिर चौफुली, प्रभात चौक, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, आयटीआय, शासकीय तंत्रनिकेतन, शिव कॉलनी चौक, गुजराल पेट्रोलपंप चौक, खोटेनगर चौक, चौबे मार्केट, ख्वाजामियाँ दर्गा चौक, गणेश कॉलनी चौक, पिंप्राळा उपनगरातील मुख्य चौक आदी भागांत खाद्यपदार्थ, भाजीपाला व इतर विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी रस्त्यांसह समांतर रस्ते अर्धेअधिक गिळंकृत करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे
शहरातील गजबजलेले महात्मा फुले मार्केट ते गांधी मार्केट यांसारख्या भागात किरकोळ विक्रेत्यांनी अर्धेअधिक रस्ते गिळंकृत केले आहेत. टॉवर चौक, अजिंठा चौफुली, नेरी नाका, नवीन बसस्थानक, व्यापारी संकुले यांसारख्या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी होते. शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने आणि अपुऱ्या व अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होते. काही वेळा पोलीस कर्मचारी नो पार्किंग बोर्ड किंवा नो एन्ट्रीचा फलक लावलेल्या आडोशालाच मोबाइलमध्ये व्यस्त असल्याने वाहतूक कोंडीकडे जाणीवपूर्वक वा ‘अर्थ’पूर्णरीत्या दुर्लक्ष होते, अशी तक्रार आहे. तसेच पेट्रोल संपलेल्या रिक्षा, दुचाकी मध्येच बंद पडल्यानंतर इतर रिक्षावाले पाय लावत बंद पडलेल्या रिक्षा नेत असतात. त्यामुळे मागील वाहतूक धीम्या गतीने होत, त्यामुळे वाहतूक कोंडीही होते. शिवाय, अपघाताचाही धोका वाढतो. धूमस्टाइल व बेशिस्तपणे तरुणाईकडून दुचाकी नेल्या जात असल्यामुळेही अपघाताचा धोका वाढला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनेही दुकानांसह कार्यालयांसमोर बेशिस्तपणे लावल्यामुळे अर्धेअधिक रस्ते व्यापले जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीही होते.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी….
तरसोद-पाळधी बाह्यवळण रस्ता सुरू झाल्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक शहराबाहेरून जात आहे, ज्यामुळे शहरातील कोंडी कमी झाली आहे. शहराबाहेर रिंग रोडसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे, ज्यामुळे भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यावरील विविध विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन नित्यनेमाने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. शिवाय, विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा देऊन, त्यांच्याकडून शुल्क आकारावे. जेणेकरून महापालिका उत्पन्नातही वाढ होऊ शकेल. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडूनही चौकाचौकांत वाहतूक नियमन करणे अपेक्षित आहे. शहरातील चौकाचौकांतील सर्व वाहतूक नियंत्रक दिव्यांचीही दुरुस्ती करून सुरू करणे अपेक्षित आहे. तसेच पाच-सहा वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनातर्फे गणेश कॉलनी रस्त्यालगतच्या शाहूनगर झोपडपट्टीस्थळी पथ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. काही महिने विक्रेत्यांनी तेथे व्यवसाय केला. मात्र, आता विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यालगतच दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिका प्रशासनाने पुन्हा विक्रेत्यांना तेथे हलविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
एकेरी मार्गही विक्रेत्यांकडून गिळंकृत
शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी एकूण क्षेत्रफळाच्या 34 टक्के जागा रस्ते आणि वाहनतळांसाठी ठेवणे आवश्यक आहे. मात्र, शहरात हे प्रमाण केवळ 13 ते 15 टक्के आहे. त्यात उपलब्ध जागेत वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एकेरी वाहतुकीचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, अंमलबजावणीबाबत महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस उदासीन असल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची मालिका सुरूच आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने काही भागांमध्ये एकेरी वाहतूक केली आहे. या भागांमध्ये एकाच दिशेने वाहने जाण्याची परवानगी आहे, तर येणारी वाहने दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहेत. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेवर टाकण्यात आली आहे. त्यात खाद्यपदार्थ व इतर वस्तू विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी रस्ते अर्धेअधिक व्यापले गेले आहेत. दुसरीकडे वाहतूक पोलीस कर्मचारी चौकांनाच चिकटून असल्याने एकेरी वाहतुकीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होणे ही नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. विसनजीनगर, दाणाबाजार, जिल्हा परिषद चौक आदी ठिकाणी दुहेरी वाहतुकीमुळे वाहनांची कोंडी होत आहे. शिवाय, मुख्य बाजारपेठेचा परिसर असलेल्या कोर्ट चौक, गोलाणी मार्केट, चित्रा चौक, सुभाष चौक, गांधी मार्केट, दाणा बाजार, घाणेकर चौक परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना बराच वेळ त्यात अडकून राहावे लागत असल्याची स्थिती आहे.
एकेरी मार्गामध्येच लागतात बेशिस्तपणे वाहने
दाणाबाजारातील पीपल्स बॅँकेसमोरील रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. या मार्गावरही विविध विक्रेत्यांकडून दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय, या मार्गाने दुहेरी वाहतूक होत असून, दुभाजकावर मालवाहू वाहने लावली जात आहेत. या वाहनांवर अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही.
शाळा-महाविद्यालयांजवळील रस्त्यांवर विक्रेत्यांची ‘शाळा’
सकाळी आठ ते दहा, सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा, तसेच दुपारी चार ते सहा यादरम्यान शाळा- महाविद्यालयांसह प्रशासकीय कार्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी रस्ते भरून वाहतात. शहरातील गणेश कॉलनीतील प. न. लुंकड शाळा, विद्यावर्धिनी संस्थेच्या शाळा, केसीई सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांसह इतर शाळा- महाविद्यालये, तसेच शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांसमोरील रस्त्यांवरही चायनीजसह विविध खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांची ‘शाळा’ भरते. या विक्रेत्यांच्या ‘शाळां’त विद्यार्थ्यांसह तरुणाईची गर्दी असते. त्यामुळे रस्ते अर्धेअधिक व्यापले जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येते. शिवाय, जिल्हाधिकारी कार्यालय, महाबळ परिसरातील अनेक प्रशासकीय कार्यालयांत जाण्यासाठी वाहनधारक कर्मचाऱ्यांची गर्दी असते. या कार्यालय परिसरातील रस्तेही खाद्यपदार्थांसह पानमसाल्याच्या हातगाड्यांनी व्यापले जात असल्यामुळे कोंडीत अधिक भर पडते.
रस्ता सुरक्षा बैठकांचा नुकताच फार्स
शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अवघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्यांवर चर्चामंथन होते. वाहतूक कोंडीवर तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जुलैमध्ये विशेष बैठक घेतली होती. त्यानंतर रस्तादुरुस्तीसंदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक, वाहतूक नियमनसंदर्भात पोलीस अधीक्षक, रस्त्यावरील अतिक्रमणसंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र लिहून यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सांगितले होते. प्रकल्प संचालकांना दिलेल्या पत्रात आकाशवाणी चौक, अजिंठा चौक आणि इच्छादेवी चौकात वाहतूक नियंत्रक दिवे उपलब्ध करून देण्याची, तसेच धुळ्याकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंबरलरच्या पट्ट्या आणि रिफ्लेक्टरही देण्याची, शिवाय तिन्ही ठिकाणचे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, तसेच या तिन्ही चौकांत यापूर्वी प्रस्तावित केलेल्या उड्डाणपुलांच्या प्रस्तावाची प्रत लवकरात लवकर सादर करणयाबाबत सूचना केल्या होत्या. महापालिका आयुक्तांनाही पत्रातून शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आकाशवाणी चौक, अजिंठा चौक व इच्छादेवी चौकात विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आल्याचे नमूद करीत तेथे तत्काळ उपाययोजना कराव्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षकांनाही आकाशवाणी चौक, अजिंठा व इच्छादेवी चौकात वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्तीबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. वाहतूक कोंडी, होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना वेळोवेळी स्मरणपत्र देण्यात आल्याचेही पत्रात नमूद होते. मात्र, महापालिका आयुक्तांसह प्रकल्प संचालक व पोलीस अधीक्षकांकडून कार्यवाही केल्याचे दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे.
आता रस्ते दुकान थाटण्यासाठी की…
शहरातील बहुतांश व्यापारी संकुलातील वाहनतळाच्या जागी विविध वस्तू विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडले आहे, तर बऱ्याच ठिकाणी दुकानदारांनी दुकानाबाहेर अतिरिक्त ओटे बांधल्याने वाहने लावण्यास जागा राहत नाही. वाहनांची संख्या वाढल्याने आणि मुख्य बाजारपेठ परिसरात वाहनतळ व्यवस्थेअभावी वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे लावली जातात. त्यात पथ विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे मुख्य रहदारीच रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. रिक्षा व हातगाडीवर फळे, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचा रस्त्यावर गराडा असतो. व्यवसाय करणे व्यावसायिकांचा हक्क असला, तरी हे करीत असताना संबंधितांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत आहे. भर रस्त्यात दुकान मांडून बसण्याने रस्ते वाहतुकीसाठी न राहता केवळ व्यावसायिकांना दुकान थाटण्यासाठी आहे की काय, असा प्रश्न आहे. शहरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या रस्त्यावरील अतिक्रमणांनी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून याकडे महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे. वाहतूक कोंडीमुळे जागोजागी काही किरकोळ अपघात होण्याचे प्रकार वाढत असल्याने यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची आवश्यता निर्माण झाली आहे.
महामार्गलगत, समांतर रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
वाढत्या अपघातांमुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण कसेबसे पूर्ण झाले. भुयारी मार्गाच्या ठिकाणी समांतर रस्तेही बनविले गेले. मात्र, अतिक्रमणाच्या विळख्याने हे समांतर रस्ते गिळंकृत केले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह महापालिका व पोलिस यंत्रणा याबाबत कमालीची उदासीन आहे. महामार्गाचे खोटेनगर ते कालंकामाता चौक या सात मार्गातील टप्प्याचे चौपदरीकरण करण्यात आले. त्यात दादावाडी, गुजराल पेट्रोलपंप, अग्रवाल चौक व प्रभात चौकात भुयारी मार्ग (अंडरपास) करण्यात आले. या मार्गालगत समांतर रस्तेही बनविण्यात आले असले, तरी या समांतर रस्त्यांना लागून अतिक्रमण होऊ लागल्याने ते निरुपयोगी ठरत आहेत. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड लोकवस्ती वाढल्यामुळे वाहनांची संख्याही हजारोंच्या संख्येने वाढली. शिवाय, महामार्गालगत हॉटेल व्यवसायही वाढीला लागला. तसेच खाद्यपदार्थांसह भाजीपाला विक्रेत्यांनी महामार्गालगत तसेच समांतर रस्त्यांवर ठिय्या मांडल्याचे दिसून येत आहे. महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल चौकात समांतर रस्ता करण्यात आला असून, मू. जे. महाविद्यालयाच्या बाजूने या रस्त्यावर ऊस, फळ व भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. थेट तंत्रनिकेतनपर्यंत वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल थाटले जात असून, वस्तू घेण्यासाठी वाहनधारक रस्त्यावरच वाहने लावत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झालेली असताना एकलव्य क्रीडा संकुलाकडून येणाऱ्या रस्त्यावरील वाहनधारक थेट विरुद्ध दिशेने अग्रवाल हॉस्पिटलपर्यंत वाहने वेगाने दामटत येतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जे नियमाने वाहन चालवितात अशा वाहनधारकांची कोंडी होऊन वाहतूकही ठप्प होत आहे. महापालिका प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणेने मिळून संयुक्त कारवाई करत हे अतिक्रमण काढून समांतर रस्ते प्रत्येक ठिकाणी मोकळे करण्याची भावना वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.
महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहिम लुटूपुटूची कारवाई
महापालिकेचा झोपेचे सोंग घेतलेला अतिक्रमण निर्मूलन विभाग तक्रारीनंतर जागे होत असल्याची स्थिती आहे. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक गाजावाजा करीत रस्त्यावरील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी बाहेर पडते आणि जागेवर तू मारल्यासारखे कर मी मेल्यासारखे करतो या लुटूपुटुच्या तोंडदेखलेपणाची कारवाई करीत, काही हातगाड्या जप्ती करीत माघारी फिरते. मात्र, अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सातत्याने रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करणे अपेक्षित असताना, कधीतरी कारवाईचा फार्स गाजावाजा करीत केला जात असल्याची स्थिती आहे. मात्र, कारवाईपूर्वीच विक्रेत्यांना पथक येत असल्याची माहिती स्थानिक पंटरांकडूनच आगावू सूचनेतून दिली जात असल्याने, विक्रेतेही ट्रॅक्टर अतिक्रमणचे पथक दिसताच गल्लीबोळात आडोशाला हातगाड्या लावून पळवाट काढतात आणि पथक गेल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. आता तर महापालिका प्रशासनच सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी दिमतीला लागला आहे. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीतच अधिक रस दाखवीत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीचे काम करताना, जळगावकरांच्या समस्यांकडेही लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहराबाहेर प्रस्तावित रिंग रोडसाठी केंद्राकडे पाठपुरावा
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहराबाहेर रिंग रोड उभारण्याचा प्रस्ताव व निधी मंजूर करावा यासंदर्भात खासदार स्मिता वाघ यांच्याकडून केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.प्रस्तावित रिंग रोड हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (सुरत-नागपूर मार्ग), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-753 एफ (जळगाव- छत्रपती संभाजीनगर) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-753जे (जळगाव- चाळीसगाव- मनमाड) या प्रमुख महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा भार कमी होऊन त्यास पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. रिंग रोड उभारल्यामुळे शहरातील जड व लांब पल्ल्याची वाहतूक बाहेरूनच वळवली जाईल. वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय कमी होईल. रस्ते सुरक्षेत वाढ होईल. औद्योगिक, लॉजिस्टिक आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. क्षेत्रीय संपर्क सुधारेल आणि भारतमाला योजनेच्या उद्दिष्टांना चालना मिळेल. रिंग रोडसाठी विकास आराखड्याचा प्रस्ताव तयार करण्यापासून निधी मंजुरीपर्यंत आवश्यक प्रक्रिया गतीने पार पाडावी, असे खासदार वाघ यांनी केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घेतली आहे. हा प्रकल्प मंजूर झाल्यास जळगाव शहराच्या भविष्यातील विकासाला मोठी चालना मिळणार असून, वाहतुकीचा ताण घटणार आहे.









