भाजप गटनेता पदाची माळ कुणाच्या गळ्यात? ‘या’केंद्रीय निरीक्षकांची भूमिका ठरणार महत्त्वाची

राज्यात सध्या बहुमत मिळून ही महायुतीचं सरकार स्थापन होत नसल्याने विरोधकांनी यावरुन टीका करायला सुरुवात केली आहे. 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं चंद्रशेखर बावणकुळे यांनी जाहीर केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. निकाल जाहीर होऊन आतापर्यंत 9 दिवस पूर्ण झाले आहेत. पण महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेलं नाही.

भाजप नेत्यांकडून येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार तयारीदेखील सुरु झाली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन गेले अनेक दिवस सस्पेंस कायम आहे.

भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील, असे संकेत देण्यात येत आहेत. पण तरीदेखील अधिकृतपणे त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. भाजपचे दोन निरीक्षक उद्या राज्यात येणार आहेत. हे निरीक्षक उद्या भाजपचा विधीमंडळ नेता आणि गटनेता ठरवणार आहे.

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. भाजपने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यामुळे राज्यातील आजच्या महायुतीच्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत .