बांगलादेश सरकारची देशातील हिंदूंच्या विरोधात दडपशाही सुरूच आहे. आता वैध प्रवासी कागदपत्रे असूनही बांगलादेशच्या सीमा अधिकाऱ्यांनी इस्कॉनच्या ५४ सदस्यांना भारतात जाण्यापासून सीमेवर रोखले.
बांगलादेशाच्या विविध जिल्हयांतील भाविकांसह इस्कॉनचे ५४ सदस्य शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी बेनापोल बॉर्डर क्रॉसिंगवर दाखल झाले होते. पण, त्यांना तेथे अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्याकडे प्रवास करण्यासाठी अधिकृत परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.
बांगलादेश सरकारने इस्कॉन संस्थेला लक्ष्य केले आहे. या संस्थेशी संबंधित पुजाऱ्यांना अटक करणे आणि त्यांची बँक खाती गोठवण्यात आल्याचे याआधी उघडकीस आले आहे. आता त्यांना भारतात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. इमिग्रेशन पोलिस अधिकाऱ्यांनी बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारशी बोलताना सांगितले की, त्यांना उच्चस्तरावरून इस्कॉनच्या सदस्यांना भारतात जाण्यासाठी परवानगी न देण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.
बेनापोल इमिग्रेशन पोलिस अधिकारी इम्तियाज अहसानुल कादर भुईया यांनी सांगितले की, आम्ही पोलिसांच्या विशेष विभागाकडे सल्लामसलत केली आहे आणि त्यांना सीमा ओलांडण्याची परवानगी न देण्याच्या सूचना आम्हाला उच्च अधिकाऱ्यांकडून मिळाल्या आहेत. सीमेवरील पोलिस अधिकाऱ्यांनी दावा केला की, इस्कॉन सदस्यांना भारतात धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहायचे आहे. त्यांच्याकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसादेखील आहे. पण, त्यांना आवश्यक असलेली विशिष्ट सरकारी परवानगी मिळालेली नाही. ते या परवानगीशिवाय सीमापार जाऊ शकत नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सीमेवर रोखले
इस्कॉनचे सदस्य असलेले सौरभ तपंदर चेली म्हणाले, आम्ही भारतात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालो होतो. पण, आम्हाला सरकारी परवानगी नसल्याचे कारण देत इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सीमेवर रोखले.