त्यावेळी आक्षेप का नाही घेतला ? परबांनी रडीचा डाव खेळू नये !

मुंबई : अनिल परब यांनी रडीचा डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर निवडणूकीचे उमेदवार अनिल परब यांनी आम्ही नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. यावर आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.

प्रविण दरेकर म्हणाले की, “अनिल परब हे वकील आहेत. निवडणुकीबाबत माहिती असणारे आमदार, कार्यकर्ते आहेत. जर त्यांचे नोंदींच्या बाबतीत काही आक्षेप होते तर आक्षेप घ्यायला वेळ असतो त्यावेळी त्यांनी आक्षेप का नाही घेतला? अनिल परब यांनी रडीचा डाव खेळू नये. कदाचित असलेल्या मतदार यादीतून त्यांना स्वतःचा पराभव दिसत असेल. पराभव झाल्यानंतरची कारणे ते आताच शोधून ठेवत आहेत,” असे ते म्हणाले.

रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, “रामदास कदम हे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांशी किंवा जाहीर मेळाव्यात वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. उणीधुणी काढायची झाली तर प्रत्येक पक्ष एकमेकांविषयीची उणीधुणी काढतील. परंतू, त्यातून महायुतीत विसंवाद होऊ शकतो. अशा गोष्टी चार भिंतीत तिन्ही पक्षाच्या समन्वय बैठकांत चर्चा व्हायला हवी,” असा सल्ला दरेकरांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, “रामदास कदम यांच्यावर कुणी आरोप केला की, दापोलीला झालेले मतदान काय दाखवून देते? तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे आहे का? महायुतीत राहून युतीतील पक्षाच्या नेत्याविषयी असे बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे. उलटपक्षी रविंद्र चव्हाण यांच्यामुळे कोकणात चांगले यश मिळालेय. नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे निवडून आले तिथे चव्हाण यांनी जीवाची बाजी लावून जागा निवडून आणली. जर एखादा नेता, आमदार महायुतीसाठी जीव ओतून काम करत असेल आणि त्यांच्याचविषयी अशा प्रकारचे वक्तव्य असेल यापेक्षा दुर्दैव काय?” असेही ते म्हणाले.