मंत्री महाजनांनी २०१९ मध्ये स्मिता वाघ यांना तिकीट का नाकारले ? वाचा काय म्हणाले

भारतीय जनता पार्टीच्या समीक्षा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांचे तिकीट कोणी नाकारले याबाबत माहिती दिली आहे. मला विजयाबाबत थोडी शंका वाटत असल्यानेच मीच स्मिता वाघ यांचे तिकीट नाकारले होते, अशी कबुली त्यांनी यावेळी दिली.

मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, ज्यांना 2019 मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली, त्यांना पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून आणले. परंतु, यावेळेस उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले. त्यांनी मित्राला बळीचा बकरा केला असा टोला मंत्री महाजन यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नाव न घेता लगावला.

गिरीश महाजन यांनी सांगितला पहिल्या निवडणुकीचा किस्सा
माझी पहिलीच विधानसभा निवडणूक होती. माझ्या विरोधात शरद पवार यांचे विश्वासू ईश्वरलाल जैन उभे होते. तेव्हा, प्रमोद महाजन यांनी मला निवडणूक लढायला सांगितलं. मी लढणार नसल्याचं महाजन यांना कळवलं. पण, त्यांनी लढावं लागेल आणि तू जिंकणार असल्याचं मला म्हटलं. मी त्यांना सांगितलं, माझ्या खिशात पाच हजार रूपये नाही, कसे निवडणूक लढू. त्यावेळी महाजन मला म्हणाले की, तू काही कर वर्गणी गोळा कर… भिक माग.. तेव्हा पाच-साडेपाच लाख रूपये वर्गणी गोळा झाली. मी निवडणूक लढलो. या निवडणुकीत 14 हजार मतांनी निवडून आलो. तेव्हापासून आजपर्यंत कधी मागे वळून पाहिलं नाही,” ” असं महाजन यांनी म्हटलं.

जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा आम्ही मोठ्या मताधिक्यानं जिंकू असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्यावेळी दोन जागा कमी आल्या. कारण, आपलेच घरभेदी होते. त्यामुळे ते घडलं, असं म्हणत गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे आमदार एकनाथ खडसे यांना लक्ष्य केलं आहे.