पती-पत्नीचं नातं हे केवळ विवाहाच्या गाठीने बांधलेलं नातं नसून, ते विश्वास, प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्याने घडतं. कोणत्याही नात्याचा गाभा विश्वास असतो. पती-पत्नींमध्ये प्रामाणिकपणा असेल, तर कोणत्याही परिस्थितीत ते एकमेकांच्या सोबत राहू शकतात. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद करणं हे नातं बळकट करण्यासाठी आवश्यक असतं. गैरसमज आणि मनातली कटुता दूर करण्यासाठी संवाद हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परस्पर सामंजस्य आणि संवादातून नातं बहरत अशीच एक सुखद घटना मध्य प्रदेशच्या इंदोरमधून समोर आली आहे .
मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीसमोर एक मोठं सत्य मांडलं. पाच वर्षांपूर्वी, ती अल्पवयीन असताना, तिच्यावर अत्याचार झाला होता. त्यावेळी ती भीतीपोटी गप्प राहिली होती. मात्र, लग्नानंतर तिने नवऱ्याला हे सत्य सांगण्याचा निर्णय घेतला.
15 फेब्रुवारी 2020 रोजी पीडितेचं आपल्या बहिणीसोबत भांडण झालं होतं. त्यामुळे ती रागाने घराबाहेर पडली आणि देवगुराडिया मंदिराजवळ पोहोचली. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने तिचा पाठलाग करत तिच्यावर जबरदस्ती केली. ती एकटी असल्याच लक्षात येताच तिला ओढून डोंगराच्या मागे घेऊन गेला. तिथे त्याने जबरदस्ती केली.त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती आणि समाजाच्या भीतीमुळे तिने कोणालाही हे सांगितलं नाही.
लग्न झाल्यानंतर तिने हे कटू सत्य नवऱ्याला सांगायच असं ठरवलं. पती आपल्याला चुकीच तर समजणार नाही ना? अशी भिती तिच्या मनात होती. पण घडलं उलटं . पती तिला म्हणाला, “घाबरु नकोस, मी तुझ्यासोबत आहे. ज्याने तुझ्यासोबत ही वाईट कृती केली, आपण त्या युवकाला शिक्षा देऊ”
पत्नीला कुठलाही दोष न देता, नवऱ्याने तिला आधार दिला आणि तिच्या बाजूने उभं राहण्याचं ठरवलं. त्याने तिला धीर देत म्हटलं, “घाबरु नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आपण आरोपीला शिक्षा मिळवू.” पत्नीच्या आत्मविश्वासात वाढ झाल्यामुळे, दोघांनी मिळून पोलिस ठाण्यात जाऊन FIR दाखल केली . पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीला लवकरच अटक करून कठोर शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
महिलेच्या धाडसामुळे आणि पतीच्या पाठिंब्यामुळे आता आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार आहे. पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला असून, लवकरच आरोपीला अटक होईल. ही घटना समाजासाठी एक मोठा संदेश आहे – महिलांनी आपल्या सत्याला आवाज द्यावा आणि योग्य पाठिंबा मिळाल्यास न्याय मिळवणे शक्य आहे.