लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एका अहवालानुसार, सुनक यांना पत्नी अक्षता मूर्तीच्या भारतासोबत प्रस्तावित मुक्त व्यापार करारामध्ये अंदाजे 500 दशलक्ष पौंड किमतीच्या इन्फोसिसच्या शेअर्सशी संबंधित काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो.‘द ऑब्झर्व्हर’चा दावा आहे की, विरोधी मजूर पक्ष आणि व्यावसायिक तज्ज्ञ या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत; कारण त्यांचा असा विश्वास आहे की, याचा फायदा अक्षताचे वडील नारायण मूर्ती यांच्या बंगळुरूस्थित आंतरराष्ट्रीय आयटी सेवा आणि सल्लागार कंपनी इन्फोसिसला होईल.
भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करारावर सतत बोलणी करत आहेत. आता चर्चेची 12 वी फेरी आहे. खासदार डॅरेन जोन्स म्हणाले की, पंतप्रधानांनी कोणतीही घोषणा काळजीपूर्वक करावी, हे आता त्यांना समजले असेल. कोणाच्याही हिताचा निर्णय घेऊ नका. जोन्स हे क्रॉस-पार्टी हाऊस ऑफ कॉमन्स बिझनेस आणि ट्रेड सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष देखील आहेत. ही समिती वाटाघाटी तपासत आहे. अलिकडेच एक तपास अहवाल समोर आला आहे; ज्यात असे सुचवण्यात आले आहे की, पंतप्रधान ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्तीच्या संबंधित व्यावसायिक हितसंबंध सार्वजनिक करण्यात गैरसमजाने आणि अनावधानाने अयशस्वी झाले आहेत.
हा अहवाल आल्यानंतर पंतप्रधानांनी बि‘टिश पार्लमेंटरी मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनची माफी मागितली होती. सुनकवर या संदर्भात आरोप झाल्यानंतर, संसदीय मानक आयुक्त डॅनियल ग्रीनबर्ग यांनी पंतप्रधानांच्या विरोधात चौकशी सुरू केली. पंतप्रधान सुनक यांनी संसदीय समितीला सांगितले की, त्यांनी मंत्रिमंडळ रजिस्टरमध्ये ते घोषित केले आहे, ज्यामुळे ग्रीनबर्गने असा निष्कर्ष काढला की सुनक हितसंबंधांच्या घोषणेबद्दल गोंधळलेले होते. बुधवारी जारी करण्यात आलेल्या त्यांच्या चौकशी अहवालात ग्रीनबर्ग म्हणाले, गोंधळामुळे ही स्थिती उद्भवली आणि अनवधानाने हे झाले आहे. तथापि, संस्थेच्या स्थायी आदेशानुसार, सुनक यांनी नियमांचे उल्लंघन मान्य केले आणि त्याबद्दल माफी मागितली.