मुंबई : राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्च्यांना वेग आला आहे. तसेच त्यांना निवडणूक लढवण्यासाठी भांडुप मतदारसंघ फिक्स झाल्याचं बोललं जात आहे. अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. त्यांच्यासाठी शिवसेना भांडूपची जागा सोडायला तयार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यातली जवळीक आणखी वाढली आहे.
अमित ठाकरेंनी भांडूप मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. उमेदवारी दिली गेली तर अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजूनही अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेतला नाही.
भांडुप मतदारसंघामध्ये सध्या रमेश कोरगावकर हे आमदार आहेत. रमेश कोरगावकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता आहे, पण अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जागा सोडायला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या भांडुपमध्ये उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आमदार आहेत. २०१९ मध्ये युवा सेनेचे प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस मनसेने तेथे उमेदवार न देता आदित्य यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. यंदाच्या लढतीत अमित यांचे नाव भांडुपमधून जाहीर झाल्यास शिवसेना उद्धव ठाकरे गट काय भूमिका घेईल, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.