दिल्ली विधानसभा भाजपा जिंकणार?

#image_title

Delhi-Assembly-BJP-Congress संपूर्ण देशाचे लक्ष सध्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. तारखांची घाेषणा झाल्यापासून आधीच तापलेले वातावरण आणखी गरम झाले आहे. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष स्वत:ची सत्ता टिकविण्यासाठी जीवाचे रान करीत आहे, तर दशकापासून सत्तेबाहेर असलेली भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येण्यासाठी जाेमाने कामाला लागली आहे. Delhi-Assembly-BJP-Congress काँग्रेस पक्षही स्वत:ची ताकद आजमावण्याचा प्रयत्न करीत आहे. लाेकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती हाेती. अर्थात, इंडिया आघाडीने एकत्रित निवडणूक लढली हाेती. परंतु, आज स्थिती बदलली आहे. काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना देशद्राेही म्हटले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र भाजपाला सुखावणारे आहे. 1998 ते 2013 पर्यंत दिल्लीत काँग्रेसची सत्ता हाेती. पण, नंतर काँग्रेसने सत्ता गमावली. आता काँग्रेसची अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे.

Delhi-Assembly-BJP-Congress दिल्लीत आम आदमी पार्टीने सलग दाेन निवडणुका जिंकल्या. या दाेन्ही वेळेस भाजपाला दहाचा आकडाही पार करता आला नव्हता, तर काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. यावरून हे लक्षात येते की, दिल्लीवर आम आदमी पक्षाची किती घट्ट पकड आहे. पण, मधल्या काळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकारी मंत्र्यांना तुरुंगवारी करावी लागल्याने पक्षाची बदनामी झाली. असे असले तरी आम आदमी पार्टीने मतदारांना जी आमिषे दाखवली आहेत, त्यामुळे मतदार खूश झाले असतील आणि पुन्हा ते याच पक्षाला काैल देतील, हे नाकारता येत नाही. मात्र, भारतीय जनता पार्टीने आम आदमी पार्टीने केलेल्या भ्रष्टाचारावर बाेट ठेवत धारेवर धरले आहे. वास्तव आणि धारणा वेगळी असल्याची बाब भाजपाकडून जनतेच्या लक्षात आणून दिली जात आहे. याचा परिणाम आम आदमी पार्टीच्या कामगिरीवर निश्चितपणे हाेईल.

भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याने पहिल्यांदा आम आदमी पार्टी दबावात असल्याचे चित्रही दिसत आहे. एकीकडे आम आदमी पार्टीने बचावात्मक पवित्रा घेतला आहे तर दुसरीकडे आक्रमक पवित्रा घेत भाजपा आणि काँग्रेसने गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे. राजधानी दिल्ली म्हणजे सत्तेचे केंद्र. पण दिल्लीचे स्वतंत्र प्रशासनदेखील असल्यामुळे दिल्लीतले राजकारण दाेन स्तरांवर रंगताना पाहायला मिळते. एकीकडे दिल्लीत देशभरातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपापसांत करीत असलेल्या दावे-प्रतिदाव्यांमुळे राजकारण जाेर धरत असताना दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता इथल्या राजकारणात वेगाने घडामाेडी घडू लागल्या आहेत. दिल्ली निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय रंग बदललेले पाहायला मिळत आहेत.

इंडिया आघाडीत फूट पडली असतानाच भाजपाप्रणीत रालाेआतही फूट पडली आहे. रालाेआचा घटक पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाने 15 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मात्र, भाजपाचे नुकसान करण्याचा आमचा हेतू नसल्याची मखलाशी करायलाही आठवले विसरले नाहीत. 70 विधानसभा जागांसाठी येत्या 5 फेब्रुवारी राेजी दिल्लीकर मतदान करणार आहेत. त्यात 58 जागा खुल्या प्रवर्गातल्या असून 12 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. दिल्लीत एकूण 1 काेटी 55 लाख मतदार आहेत आणि त्यातले 83.49 लाख पुरुष तर 71.74 लाख महिला मतदार आहेत. यामध्ये 25 लाख 89 हजार तरुण मतदार असून त्यातही 2.08 लाख नवमतदार आहेत. हे सगळे मतदार आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे भवितव्य सुनिश्चित करणार आहेत. गेल्या पाच विधानसभा निवडणुकांपैकी दाेन विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीत आम आदमी पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यात 2011 सालच्या भ्रष्टाचारविराेधातील आंदाेलनातून आम आदमी पक्षाचा झालेला जन्म दिल्लीच्या राजकारणाला संपूर्ण कलाटणी देणारा ठरला. काँग्रेससाठी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या राजकारणात पाय राेवण्याचा सक्षम प्रयत्न 2013 साली केल्याचे दिसून येते. परिणामी त्यांना 31 जागांवर विजयही मिळाला. पण पुढच्या दाेनच वर्षांत झालेल्या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली आणि आम आदमी पक्षाने दिल्लीत ऐतिहासिक असा विजय मिळविला. मात्र, हे ऐतिहासिक यश आपला पचविता आले नाही, असे दिसते आहे. अण्णा हजारे यांचा आधार घेत दिल्लीत आंदाेलन उभे करत आणि अण्णांचा विश्वासघात करत राजकारणात उतरलेले अरविंद केजरीवाल हे आधी छाेट्याशा मारुती कारमधून फिरायचे. मला गाडी-बंगला काहीही नकाे म्हणायचे. लाेकांपुढे साधेपणाचे साेंग घेतलेला हा माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर पार बदलला आणि माेठमाेठ्या आलिशान गाड्यांमधून पाेलिस संरक्षणात फीरू लागला.

सरकारी बंगला नकाे म्हणता म्हणता या ढाेंगी माणसाने स्वत:साठी चक्क ‘शिशमहल’ बनविला. पक्षाचे नाव आम आदमी आणि हे केजरीवाल झाले खास आदमी. जनतेला फुकटात वीज, पाणी दिले. जनता खूश झाली. पण, आता या केजरीवाल महाशयाचे खरे रूप जनतेपुढे आले आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी राेजी मतदार कुणाकडे झुकतात, हे पाहावे लागेल. काहीही असाे, ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. आधी हरयाणा आणि नंतर महाराष्ट्रात मिळालेल्या भरघाेस यशामुळे भारतीय जनता पार्टीचे मनाेबल वाढले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काही महिन्यांपासून चालवलेल्या सातत्यपूर्ण आणि केंद्रित प्रचार माेहिमेच्या आधारे, दिल्ली विधानसभा निवडणुकीत दलितांचा प्रभाव असणाऱ्या या मतदारसंघांमध्ये भाजपाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा हाेण्याची आशा व्यक्त केली जात आहे. 2015 आणि 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 12 मतदारसंघांपैकी एकही जागा जिंकता आली नव्हती.

मागील निवडणुकांमध्येही भाजपाला यापैकी दाेन किंवा तीनपेक्षा जास्त जागा कधीच जिंकता आल्या नव्हत्या. त्यामुळे यावेळी भाजपाने कंबर कसली असल्याचे दिसते आहे. दिल्लीत 30 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेले 12 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये दलित समुदायाचे मतदार 17 ते 45 टक्के आहेत. या 12 राखीव मतदारसंघांव्यतिरिक्त राजेंद्र नगर, चांदनी चाैक, आदर्श नगर, शाहदरा, तुघलकाबाद, बिजवासन यासह 18 इतर जागा आहेत जिथे अनुसूचित जाती समुदाय 25 टक्क्यांपर्यंत मतदान करताे; जिथे भाजपाला कसून मेेहनत करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांत, या 30 मतदारसंघांमधील झाेपडपट्ट्या आणि अनधिकृत वसाहतींमध्ये अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांद्वारे व्यापक पाेहाेच माेहीम भाजपाकडून राबविण्यात आली.

या सर्व 30 मतदारसंघांमध्ये समुदायातील सदस्यांमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी वरिष्ठ एससी कार्यकर्त्यांना विस्तारक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचा फायदा भाजपाला हाेण्याची शक्यता दिसते आहे. या विस्तारकांनी या मतदारसंघांमधील विविध वस्त्या आणि निवासी भागातील व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 10 दलित तरुणांना तैनात केले जाण्याची भाजपाची रणनीती निवडणुकीचे निकाल बदलेल, असे चित्र दिसते आहे. भाजपाने अशी 5,600 हून अधिक मतदान केंद्रे ओळखली आहेत. त्यापैकी 1,900 हून अधिक मतदान केंद्रांवर विशेष लक्ष पक्षाकडून दिले आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत जी व्यूहरचना भाजपाने केली हाेती, त्यापेक्षाही प्रभावी रणनीती दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आखली असल्याने आणि आम आदमी पक्षाने केलेल्या भ्रष्टाचारावर प्रहार केले जात असल्याने भाजपाला माेठा लाभ हाेईल आणि इतिहास घडेल, असे जे बाेलले जात आहे, ते खरे ठरते का, हे 8 फेब्रुवारीला कळेलच.

मतदारांशी संवाद साधण्यासाठी आणि माेदी सरकारने समाजासाठी केलेले काम आणि आम आदमी पक्षाच्या 10 वर्षांच्या राजवटीत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत समजावून सांगण्यासाठी 18 हजारांहून अधिक सक्रिय कार्यकर्ते दिल्लीत फिरत आहेत. ही नवी रणनीतीही भाजपाला यश मिळवून देईल का, हेही पाहण्यासारखे असेल. दिल्ली जिंकण्यासाठी प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपाने पक्षातील 55 माेठ्या दलित नेत्यांचा समावेश केला; ज्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरयाणा येथील माजी केंद्रीय मंत्री आणि खासदारांचा समावेश आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रचारातील हे वेगळेपण भाजपाला विजय मिळवून देईल, असे स्पष्ट दिसते आहे.