GST Rate Cut: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी दरांमध्ये कपात करण्याचे संकेत दिले आहेत. कर स्लॅबचे तर्कसंगतीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच जीएसटी दर आणखी कमी केले जातील असे त्या द इकॉनॉमिक टाईम्स अवॉर्ड्समध्ये बोलताना म्हणाल्या.
अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील त्यांच्या राज्य समकक्षांच्या जीएसटी परिषदेने सप्टेंबर २०२१ मध्ये दरांचे तर्कसंगतीकरण करण्यासाठी आणि स्लॅबमध्ये बदल सुचवण्यासाठी मंत्र्यांचा एक गट (जीओएम) स्थापन केला होता. ‘द इकॉनॉमिक टाईम्स अवॉर्ड्स’मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या, “जीएसटी दर आणि स्लॅबचे तर्कसंगतीकरण करण्याचे काम जवळजवळ अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.”
त्या म्हणाल्या, “जीओएम उत्तम काम केले आहे, परंतु आता या टप्प्यावर मी पुन्हा एकदा प्रत्येक गटाच्या कामाचा पूर्णपणे आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि नंतर कदाचित मी ते परिषदेकडे घेऊन जाईन. त्यानंतर आपण यावर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की नाही याचा विचार केला जाईल.”
सीतारमण म्हणाल्या की दरांचे तर्कसंगतीकरण करण्यासाठी आणखी काही काम आवश्यक आहे. “आम्ही ते पुढील परिषदेत घेऊन जाऊ. आम्ही दर कपात, तर्कसंगतीकरण, स्लॅबची संख्या विचारात घेणे इत्यादी काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत.” असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे.