चंद्रशेखर जोशी
बांगलादेशी स्थलांतरितांचा उघड वावर जळगाव जिल्ह्यात असल्याचे एका मोठ्या कारवाईने समोर आले आहे. ‘तरुण भारत’ने याबाबत नेहमीच कटाक्षाने आवाज उठवला आहे. प्रशासकीय कारवाईत ४३ जणांवर बनावट जन्मदाखल्यांबाबत गुन्हा दाखल झाल्याची बाब प्रसार माध्यमांमधून समोर आली. आता याप्रश्नी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून म्हणजे १९६० पासून मूळ दस्तऐवजांची पडताळणी केली जात आहे. यात जवळपास ३३ जणांवर ही संशयाची सुई सरकली आहे. याबाबत कायदा जाणणाऱ्या काहींना अटकही झाली. तहसीलदारांच्या बनावट दाखल्यांनी आदेश काढून जन्मदाखले मिळवण्यात आले. हे कटकारस्थान आहे? की अर्थार्जनासाठी केलेला फंडा आहे? की धार्मिक एकजुटीतून केलेला राष्ट्रद्रोह आहे? हे तातडीने तपासण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणांवर आली आहे. डोळेझाक करणे, दिसत असूनही दुर्लक्ष करणे असे प्रकारही यात घडले असतील कदाचित. पण आता प्रकरणं उघड होऊ लागली आहेत तर सारी चौकशी खोलवर व्हायला हवी. यावर एक देशाभिमानी शेर आठवतो ‘आज़ादी की कभी शाम नहीं होने देंगे, शहिदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे, बची हो जो एक बूंद भी गरम लहू की, तब तक भारत माता का आँचल नीलाम नहीं होने देंगे।’ चौकशी यंत्रणेने याचा विचार करावा.
खोट्या कागदपत्रांचा वापर करून बेकायदा भारतात वास्तव्य करणारे स्थलांतरित बांगलादेशी येथील सरकारी योजनांचा लाभ कसे मिळवत आहेत हेही उघड होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे बांगलादेशी कुटुंब कसे स्थायिक झाले, याचे किस्से वर्तमानपत्रात छापून आले. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. यात तर कहर झाला आहे. जिथे बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित असल्याचा संशय असलेल्या १८१ व्यक्तींनी पीएम-किसान योजनेअंतर्गत ३ कोटी रुपयांचे फायदे मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे वृत्त आहे. यामुळे एक गंभीर चिंता निर्माण झाली आहे. बनावट लाभार्थीना शोधणे आणि त्यांना देशातून हाकलून लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, किती बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित कल्याणकारी योजनांचा गैरफायदा घेत आहेत? याचा गांभीर्याने शोध घ्यावा लागणार आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधील एका गावातून अलीकडच्या अहवालानंतर या मुद्यावर लक्ष वेधले गेले. जिथे १८१ व्यक्तींनी पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रे दिल्याचे आढळून आले. तपासात असे दिसून आले की, हे लोक म्यानमारमधील बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरित होते; जे या भागात बेकायदेशीरपणे स्थायिक झाले होते. शिवाय, बनावट दाव्यांशी जोडलेली त्यांची बँक खाती महाराष्ट्राऐवजी पश्चिम बंगालमध्ये सापडली आहेत. ज्यामुळे संघटितरीत्या फसवणूक आणि घुसखोरीबद्दल अधिक चिंता निर्माण होते.
जळगाव जिल्ह्यात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. बांगलादेशी घुसखोर येथेदेखील रहात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या विषयाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. मुंबईतून एक देशभक्त जळगावात येतो आणि पोलीस प्रशासनास बांगलादेशी घुसखोरांची माहिती देतो, किती गंभीर आहे हे प्रकरण…? राजकीय नेतेमंडळींना ही माहिती मिळते, मग आमचे प्रशासन झोपेत आहे काय? की कोणाच्या दबावात काम करते आहे? ज्या एरियात या व्यक्ती राहतात, त्या परिसराची कसून तपासणी होणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यातील काही धार्मिक नेतेमंडळींचा ‘सिमी’ तसेच काही अतिरेकी संघटनांशी संपर्क आढळून आला आहे. ही पार्श्वभूमी विसरता कामा नये. नाशिक जिल्ह्यात ज्याप्रमाणे बांगलादेशी घुसखोरी आढळून आली तसेच जळगाव जिल्ह्यातही हे प्रमाण निश्चितच असावे.
अधिकारी अन् नागरिकांनी सतर्कतेने माहिती द्यावी
शासकीय योजनांचा ही मंडळी लाभ घेत असतील तर प्रशासकीय यंत्रणांनी याचा शोध तत्काळ घेणे गरजेचे आहे. मागे एक बांगलादेशी तरुणी महिला सुधारगृहातून पळून गेली. पोलीस प्रशासन अद्यापही तिचा शोध घेऊ शकलेले नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी सांगितलेल्या व दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर हे प्रशासन कारवाई करेल की नाही, याबाबत शंका निर्माण होते. नागरिकांनीदेखील सतर्क व्यक्तींची माहिती देणे आवश्यक आहे. धर्म प्रेम आवश्यकच, पण जेव्हा राष्ट्राचा प्रश्न निर्माण होतो त्या वेळी देशप्रेमी मुस्लिमांनदिखील सजग राहून अशा घुसखोरांची माहिती प्रशासनास देणे गरजेचे आहे. पाहू या जळगाव जिल्ह्यातील मुस्तीम बांधव अशी हिम्मत दाखवतात का? धोरणांची अंमलबजावणी, तळागाळातील सहभाग आणि कठोर कायदेशीर कारवाई एकत्रित करणाऱ्या बहुआयामी दृष्टिकोनामुळे भारताच्या कल्याणकारी योजना त्यांच्या इच्छित उद्देशांची पूर्तता करतील राजकीय फायद्यांसाठी पद्धतशीर शोषण रोखताना पात्र लाभार्थीचा स्तर उंचावता येऊ शकेल आणि या योजनांचा फायदा खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी चुकीच्या गोष्टींना आळा बसणे हे गरजेचे आहे. जळगाव जिल्हा घुसखोरांचा अड्डा होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येकाने आपले कर्तव्य राष्ट्रप्रेमातून पार पाडले पाहिजे.