Devendra Fadnavis: महापालिका निवडणुकीत महायुती आणि मनसे एकत्र लढणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

#image_title

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत 128 जागांवर निबडणूक लढवली होती. परंतु मनसेला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हा मनसेचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पराजय मानला जात आहे.

दरम्यान, राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे बाबत एक सूचक वक्तव्य केले आहे. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी ‘सह्याद्री’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये , महापालिका निवडणुकीत महायुती आणि राज ठाकरे हे कॉम्बिनेशन पाहायला मिळणार का? प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत म्हणाले की, महापालिका निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू.

”आमच्याकडे त्यांना द्यायला जागा नव्हत्या, कारण आम्ही ३ पक्ष होतो. वस्तुस्थिती लक्षात घेत त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना मतं चांगली मिळाली आहेत.” असं म्हणत फडणवीस यांनी मनसेचं कौतुक केलं. मनसेचे आणि आमचे विचार मेळ खातात. मनसेला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला आनंद आणि रस आहे. महापालिका निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू.

असं म्हणत फडणवीसांनी पुढच्या निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घेण्याबाबत विधान केलं आहे. एवढंच नाही तर मनसेला सरकारसोबत ठेवण्यात आनंद वाटेल, असंही म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या अभिनंदनाचे आणि विधायक उपक्रमांना पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबाबत सकारात्मक आणि आशादायक वक्तव्य केले आहे.