बस्तर नक्षलमुक्त होईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा निर्धार बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी मंगळवारी व्यक्त केला. सोमवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरेपुंजे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आपईडी स्फोटात हुतात्मा झाले. त्यानंतर सुंदरराज यांनी त्या घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पोलिस नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत, असेही सुंदरराज यांनी स्पष्ट केले.
नक्षलवाद्यांनी पेरलेला आणखी एक आयईडी घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. या घटनेत सहभागी असलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली, अशी माहिती सुंदरराज यांनी दिली. कोंटा परिसरातील दगडाच्या खाणीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात सोमवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरेपुंजे हुतात्मा, तर इतर दोन पोलिस अधिकारी जखमी झाले होते. सुंदरराज यांनी हुतात्मा पोलिस अधिकाऱ्याला आदरांजली अर्पण करताना त्यांचे बलिदान वाया जाणार नाही, असे सांगितले.
घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी कोंटा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. आपण प्रत्येक आघाडीवर सज्ज आहोत आणि नक्षलवाद्यांचा जोरदार सामना केला जाईल, असे त्यांनी जवानांसोबत संवाद साधताना सांगितले. सुरक्षा कर्मचान्यांनी मजबूत, दृढनिश्चयी आणि लवचीक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
बस्तर पूर्णपणे नक्षलमुक्त होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आकाश राव व इतरांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांचा वारसा शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी आमच्या ध्येयाला प्रेरणा देत राहील असे सांगितले. या घटनेनंतर बॉम्बनाशक पथकाने घटनास्थळाची तपासणी केली. त्यांना आणखी एक पेरलेला आयईडी सापडला.