---Advertisement---
वॉशिंग्टन : इराणसोबतच्या चर्चेत प्रगती असल्याचा दावा एकीकडे अमेरिकेने केला असला, तरी कोणताही करार न झाल्यास युद्धाची तीव्रता वाढवली जाईल, अशी धमकीही दिली आहे. याच पृष्ठभूमीवर अमेरिकेचे हजारो अतिरिक्त सैनिक मध्यपूर्वेच्या दिशेने रवाना होत आहेत.
विमानवाहू नौका यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश मंगळवारी मोहिमेवर रवाना झाली असून, तीन विनाशिकांसह ती मध्यपूर्वेकडे जाणार असल्याचे अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले. या ‘कॅरियर स्ट्राईक ग्रुप’मध्ये सहा हजारांपेक्षा जास्त नौसैनिकांचा समावेश आहे.
८० व्या एअरबॉर्न डिव्हिजनचे हजारो सैनिकही मध्यपूर्वेत दाखल होत असताना ही घडामोड घडली, असे दोन अमेरिकी अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. या सैनिकांपैकी बहुतांश सैनिक हे युद्धापूर्वीच नियोजित करण्यात आलेल्या सैन्य-फेरबदलाचा भाग असले, तरी काही सैनिक हे अशा जवळपास १५०० पॅराटुपर्सपैकी आहेत, ज्यांना या प्रदेशात अतिरिक्त कुमक म्हणून पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने मागील आठवड्यात घेतला आहे.
हे सैनिक नेमकी कोणती भूमिका पार पाडतील, हे ट्रम्प प्रशासनाने सांगितलेले नाही. परंतु, ८२ व्या एअरबॉर्न तुकडीला महत्त्वाचा प्रदेश आणि विमानतळ सुरक्षित करण्यासाठी शत्रूच्या किंवा वादग्रस्त प्रदेशात पॅराशूटने उतरण्याचे प्रशिक्षण दिले आहे. जवळपास २५०० नौसैनिक घेऊन जाणारे अमेरिकी नौदलाचे एक जहाज नुकतेच मध्यपूर्वेत दाखल झाले असून, आणखी २५०० नौसैनिक कॅलिफोर्नियाहून तैनात केले जात आहेत.
संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांनी अमेरिका इराणविरुद्ध लष्कर तैनात करेल की नाही, या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले असताना, या प्रदेशात आधीच तैनात असलेल्या हजारो सैनिकांव्यतिरिक्त ही अतिरिक्त कुमक अशा वेळी पाठवण्यात आली. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला, प्रत्यक्ष रणांगणावर सैन्य उतरवण्यासह, तुम्ही काय करण्यास तयार आहात किंवा काय करण्यास तयार नाही, हे आधीच सांगितले, तर तुम्ही युद्ध लढून जिंकू शकत नाही, असे हेगसेथ यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
विमानवाहू फोर्ड नौकेवर आग
जगातील सर्वात मोठी विमानवाहू नौका यूएसएस जेराल्ड आर. फोर्डच्या कपडे धुण्याच्या खोलीत १२ मार्च रोजी आग लागली. यामुळे ती दुरुस्तीसाठी क्रेट येथील नौदल तळावर पाठवण्यासाठी या नौकेला लाल समुद्रातून भूमध्य समुद्रात परतावे लागले.
- जमिनीवरील युद्धाकरिता येण्यासाठी आमच्याकडे १५ वेगवेगळ्या पद्धती आहेत, असे आमच्या शत्रूला वाटते. आम्ही प्रत्यक्षात असे करू शकतो. पण, लष्करी पातळीवर जेवढे अत्यावश्यक आहे, त्यापेक्षा अधिक काहीही करण्याची वेळ यावी, असे आम्हाला वाटत नसल्याने चर्चेद्वारे इराणची करार घडवून आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
पीट हेगसेथ, संरक्षण सचिव









