मुंबई : भररस्त्यात अंगप्रदर्शन करणं अभिनेत्री उर्फी जावेदला महागात पडण्याची शक्यता आहे. ऊर्फीच्या या वर्तनावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पोलीस उर्फीवर काय कारवाई करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पत्रात काय म्हटलंय?
“उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार, स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही.
मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे”, असे चित्रा वाघ यांनी या पत्रात म्हटले आहे.