Beed murder case: वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार ? CID चार विशेष पथकं कराडच्या शोधात

Beed murder case: मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतील सहा लोकांनी  त्यांचे अपहरण केले  होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह आढळला. हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. या हत्येतील संशयित मुख्य आरोपी  वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार आहे.   वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात आहे.

सीआयडीने वाल्मीक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला आहे. त्याच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी केली. त्याशिवाय सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली. त्यामुळे अडचणीत सापडलेला वाल्मीक कराड आज सरेंडर करणार असल्याचे बोलले जातेय.

वाल्मीक कराडच्या शोधासाठी CID कडून मोठा प्रयत्न सुरु आहे. आज चार विशेष पथकं कराडच्या शोधात तपास करत आहेत. पुण्यातून दोन पथकं पहाटेच रवाना झाली, तर एक पथक सकाळी सुद्धा शोधासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच, कराडचे अनेक कार्यकर्ते सीआयडीच्या कार्यालयाबाहेर दाखल झाले आहेत. घटनास्थळी अधिक तपास सुरु आहे, आणि सीआयडीने कराडला गाठण्यासाठी विविध ठिकाणी कारवाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात आज सकाळी ११ वाजता स्वतःला शरण देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाल्मिक कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठवली

तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून जप्ती सुरु झाली आहे. सीआयडीकडून या प्रकरण खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यात वाल्मिक कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठवली गेली आहे. त्यासोबतच वाल्मिक कराडची आणखी कोणत्या बँकेत खाती आहेत, याचाही शोध सुरु आहे. या जप्ती संदर्भातील पत्र सीआयडीकडून उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.