‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी बातमी! अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार का?

Ladki Bahin Yojana:  राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर,  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकारकडून  एक पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आहे. या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की, नाही हे तपासणं हा आहे, जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल, असं सांगितलं जात आहे.

लाडकी बहिण योजनेसाठी काही विशिष्ट निकष आहेत. यामध्ये योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे पती आयकर भरतात का, कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का, इत्यादी गोष्टी तपासल्या जातील.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीनं करण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाच्या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली होती. काही महिलांना अर्ज माघारी घेण्याबाबत ऑफलाईन पध्दतीने आणि ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत.

निवडणूक झाल्यानंतर अपात्र महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आलं. त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहि‍णींना दिलेली रक्कम परत घेणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे ?

अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेचं मूल्यमापन करणं यात काही नवीन नाही. इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं. अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

“कोणतीही योजना घ्या, त्या योजनांची दरवर्षी फेरतपासणी केली जाते. ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘गॅस सबसिडी’, ‘नमो शेतकरी योजना’, या अशा सर्व योजनांची वर्षभरातून एकदातरी फेरतपासणी केली जातेच. ही काय नवीन किंवा जगावेगळी प्रक्रिया नाही. लाडकी बहीण योजनेचं हे पहिलंच वर्ष असल्याने याबाबत असा संभ्रम तयार करण्यात येतोय. आतापर्यंत विविध विभागातील थेट लाभांच्या योजनेचं फेरतपासणी करणं ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात काही वेगळं आहे,असं काही नाही”, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.