हिवाळ्यातील पौष्टिक डिंकाचे लाडू

तरुण भारत लाईव्ह । ४ जानेवारी २०२३। हिवाळा म्हटलं की, डिंकाचे लाडू, खजुराचे लाडू, सुकामेवा लाडू या सगळ्या गोष्टींची घरात लगबग चालू असते. लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी हे लाडू अतिशय पौष्टिक असतात. हिवाळा आणि डिंकाचे लाडू हे कॉम्बिनेशन प्रत्येक घरात पहायला मिळत. डिंकात भरपुर पौष्टिक मूल्य असतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे लाडू कसे बनवले जातात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य
पाव किलो डिंक, १०० ग्राम काजू , १०० ग्राम बदाम, पाव किलो खारीक, पाव किलो खोबरे, चवीनुसार वेलची पूड, ३ वाट्या गुळ, साजूक तूप, आवडीनुसार इतर सुकामेवा.

कृती
प्रथम डिंक साजूक तुपात तळून घ्यावा. खोबऱ्याचा किस करून त्यालाही तुपातून परतून घ्यावा. खारीक मिक्सर मधून बारीक करून घ्यावी.  काजू बदाम यांचे सोयीनुसार छोटे काप करून घ्यावे, किंवा तुम्ही त्याला दळूनही घेऊ शकता. तळलेला डिंक देखील मिक्सरमधून बारीक करून घ्यावा.  त्यांनतर हा सर्व सुकामेवा तुपावर परतून सर्व मिश्रण परातीत काढून घ्यावे, चवीनुसार वेलची पूड टाकावी. त्यात ३ वाट्या गूळ घालून एकजीव करावे. हे मिश्रण कोरडे वाटलयास २ चमचे साजूक तूप गरम करून घालावे व छोटे -छोटे लाडू वळून घ्यावे.