एड्स दिन विशेष
रवींद्र मोराणकर
जळगाव : समाजाकडून दुर्लक्षित झालेल्या पण त्यांना जगण्याचा, सहजीवनाचा आनंद मिळवून देण्यासाठी समाजात पुढकार घेणारे काही घटक आहेत. त्यात कानळदा येथील विद्यमान सरपंच तथा सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक पुंडलिक तुळशीराम सपकाळे यांचा समावेश आहे. अशाच एचआयव्हीसह जीवन जगणार्या तिघांचे गुरुवारी सामूहिक विवाह लावून देण्यासाठी सपकाळे यांनी पुढाकार घेतला आहे. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. यासाठी शहीद हेमंत करकरे यांच्यापासून प्रेरणा मिळाल्याचे सपकाळे यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
वारांगणा, त्यांच्या मुलांना रोजगारासाठी हातभार
राज्यातील विविध भागातील तीन एड्स एचआयव्हीग्रस्तांचे सामूहिक विवाह कानळदा, ता. जळगाव येथे एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर रोजी होतील. या मागील पार्श्वभूमी सांगताना पुंडलिक सपकाळे म्हणाले की, मी 1993 मध्ये चंद्रपूरला पोलीस निरीक्षक होतो. तेव्हा हेमंत करकरे हे जिल्हा पोलीस अधीक्षक होते. वारांगणांची वस्ती असलेल्या भागातील पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून हेमंत करकरे यांची माझी नियुक्ती केली. तेव्हा एचआयव्ही एड्स आजाराची सुरुवात झालेली होती. प्रमाणही जास्त होते. तेव्हा वारांगणांच्या मुलांसाठी शाळा सुरू करणे, वारांगणांसाठी आरोग्य शिबिरे घेणे, रेशन कार्ड काढून देणे, वारांगणांच्या मुलांना रोजगार, जीवन जगण्याच्या साधने उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. यात करकरे यांचा पुढाकार होता.
करकरेंची आठवण राहावी म्हणून केले वेगळे काम
वारांगणांसाठी वेगळे उपक्रम राबविण्यामुळे मला नवी दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री पुरस्कार मिळाला. यानंतर करकरे यांची बदली झाली. मी दुसर्या जिल्ह्यात गेलो. यानंतर 2008 मध्ये माझी पुन्हा चंद्रपूरला बदली झाली. यानंतर ‘26/11’ला (26 नोव्हेंबर 2008) मुंबईत अतिरेकी हल्ला झाला. त्यात साळसकर, अशोक कामटे, हेमंत करसरे यांच्यासह काही नागरिक शहीद झाले. तेव्हा हेमंत करकरे हे एटीएसचे प्रमुख होेते. करकरे हे अतिरेकी हल्ल्यात शहीद झाल्याने मलाही धक्का बसला. यापासून कसं सावरायचं, करकरे यांची कायम आठवण ठेवावी म्हणून मी ‘26/11’पासूनच बरोबर पाच दिवसांनी 1 डिसेंबर 2008 जागतिक एड्स दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
ड्युटी असेल त्या गावात लावले एचआयव्ही सहजीवन जगणार्यांचे विवाह
हेमंत करकरे यांचे एड्स या आजाराबाबत असलेले गांभिर्य, वारांगणांसाठी केलेलं काम याची मलाही आठवण राहावी, इतरांना या आजाराची जाणीव करून द्यावी, जनजागृती व्हावी या हेतूने 1 डिसेंबर 2008 पासून एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. एचआयव्ही झालेले नागरिक असतील त्यांचे गेट टुगेटर करता येईल का, असा विचार करून एचआयव्हीसह जगणार्या लोकांना एकत्र करून त्यांच्यासोबत काम करू लागलो. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने एचआयव्हीग्रस्तांचे विवाह लावण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी माझी ड्युटी ज्या ठिकाणी असेल तेथे हे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. 2008 पासून आतापर्यंत 14 वर्षात अशा एचआयव्ही सहजीवन जगणार्या 38 तरुण-तरुणींचे विवाह लावले. 1 डिसेंबर 2022 रोजी असे तीन जोडपी विवाहबद्ध होतील.
कानळदेवासींसोबतच कर्तव्य ग्रुपचेही सहकार्य
जून 2020 ला सेवानिवृत्त झालो. तेव्हापासून कानळदा येथे असे सामूहिक विवाह लावण्यास सुरुवात केली. कानळदा येथे पहिल्या वर्षी आर्थिक झळ मी स्वत: सहन केली. पण गेल्या वर्षी 2021 मध्ये हा गावाचा उपक्रम झाला. कानळदेकरांनी भरीव योगदान दिले. कानळदेवासींसोबतच कर्तव्य ग्रुपचेही सहकार्य असते. लग्नाच्या दोन तास आधी तरुणांचे पबोधन शिबिर घेतले जाते. एड्स वाढू नये म्हणून जनजागृती करतो. सोह्ळ्यात मी कन्यादान करतो. एचआयव्हीसह जीवन जगणार्यांचे विवाह 1 डिसेंबरला तर लावतोच. पण याव्यतिरिक्त इतरही वेळेस अशी त्यांच्या पात्रतेनुसार जोडपी आढळल्यास त्यांचेही विवाह वेळोेवेळी लावत असतो.
किन्नरांचेही प्रश्न
आतापर्यंत ज्यांचे विवाह लावले त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. तेही या सोहळ्यास येतात. एचआयव्हीसह जगणारे, एचआयव्हीसाठी काम करणार्या स्वयंसेवी संस्था यांचे गेट टुगेदर वेगवेगळ्या लोकांच्या साक्षीने घेतो. या दरम्यान 2013 पासून किन्नरांना सोबत घेण्यास सुरुवात केली. किन्नरांचेही गेट टुगेदर घेतो. किन्नरांच्याही काही समस्या असतात. त्या सोडवू लागलो. किन्नरांना कब्रस्तानात दफनसाठी जागा मिळत नसे. त्यासाठी पुढाकार घेऊन सन्मानाने दफनविधीसाठी जागा मिळू लागल्या. बरेचसे बहुरुपी मंडळी किन्नरांचा वेष परिधान करतात आणि लोकांना त्रास देतात. पण मूळ किन्नर, खरे किन्नर यांच्या बाबतीत हा प्रकार खूप कमी ठिकाणी आढळतो. किन्नरांनाही या सोहळ्यासाठी बोलवितो. यांचाही सत्कार करतो. यामुळे इतरही त्यांना मान देतात. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच, पदाधिकारी, नागरिक उपस्थित राहतात. या उपक्रमाविषयीची अधिक माहिती pundlik sapkale the human being या यु ट्यूबवर मिळेल, असेही पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले.