ऑनलाईन गेमिंग कायद्याच्या चौकटीत

तरुण भारत लाईव्ह । गिरीश शेरेकर । भारतात Online Gaming ऑनलाईन गेमिंग हा प्रकार चांगलाच फोफावला आहे. पत्त्यांमधील रमी असो किंवा अन्य कोणता गेम असो, प्रत्येक व्यक्ती ही मोबाईलमध्ये वेगवेगळे व्हिडीओ तरी बघते किंवा गेम तरी खेळते. मध्यंतरी ‘पब-जी’ या गेमने अनेकांना हैराण केले. शाळकरी मुलांना तर या गेमचे व्यसनच लागले होते. देशात ऑनलाईन गेमिंग व्यवसायाच्या वेगाने होणार्‍या प्रसाराबाबत अनेक स्तरावर चिंता व्यक्त केली गेली. अनेकांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम गमावल्याच्या घटना समोर आल्या. यातून आलेल्या नैराश्यामुळे काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलसुद्धा उचलल्याच्या घटना घडल्या आहेत. Online Gaming  ऑनलाईन गेमिंग व्यवसायाच्या अनेक बाजूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक निश्चित अशी कारवाई करण्याची व्यवस्था अस्तित्वात नसणे, हेही चिंता वाढवणारे होते. साधारणपणे ऑनलाईन गेमिंग हा विषय राज्य सरकारांचा मानला जातो. पण, या संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात राज्य सरकारांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही विशिष्ट अ‍ॅप्सवर किंवा वेबसाईट्सवर संबंधित राज्यापुरतीच जिओ ब्लॉकिंगची कारवाई करणे राज्यांसाठी कठीण होऊन बसले आहे. शिवाय एका राज्यात जारी करण्यात आलेले आदेश दुसर्‍या राज्यांसाठी लागू करता येणार नाहीत. त्यामुळे देशभरात ऑनलाईन गेमिंग व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणणे अवघड होते. शिवाय देशाबाहेरून नियंत्रित होणार्‍या वेबसाईट ब्लॉक करण्याचे केंद्र सरकारएवढे अधिकार राज्य सरकारांकडे नाहीत. या सर्व तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनेच पुढाकार घेतला असून, कायद्याचा मसुदा तयार केला आहे. फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन गेमिंग कायद्याच्या चौकटीत आणण्याचा सरकारचा निर्धार आहे.

Online Gaming  ऑनलाईन गेमिंग कंपन्यांसाठी ‘मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा-2022’ मसुदा जाहीर करण्यात आला आहे. मसुद्यानुसार, सरकारने ऑनलाईन गेमिंग कंपन्यांसाठी एक स्वयं-नियामक यंत्रणा, खेळाडूंची अनिवार्य पडताळणी आणि भौतिक भारतीय पत्त्याचा प्रस्ताव दिला आहे. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत आणले जाईल. त्याचवेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि मेटाव्हर्स यांचाही या नियमांमध्ये समावेश केला जाईल. महिला आणि मुलांसाठी ऑनलाईन गेमिंग सुरक्षित करण्याबाबतही या मसुद्यात चर्चा करण्यात आली आहे. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना भारतात लागू असलेल्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक राहील. जुगार किंवा सट्टेबाजीशी संबंधित कोणताही कायदा या कंपन्यांना लागू होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी 2021 मध्ये जारी करण्यात आलेल्या नवीन आयटी नियमांतर्गत ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचा समावेश होणार आहे. मसुद्यातील नियमांवर 17 जानेवारीपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. 2017 मध्ये तेलंगणा राज्याने ऑनलाईन गेमिंगवर कायदा केला आहे. असा कायदा करणारे ते पहिले राज्य आहे. या कायद्यात त्यांनी शिक्षेच्या अनेक तरतुदी केल्या आहेत. आता केंद्रानेच पुढाकार घेतल्याने नवा कायदा देशभरात लागू होईल.
Online Gaming  ऑनलाईन गेमिंगला कायद्याच्या चौकटीत आणणे ही काळाची गरज आहे. अनेक तरुण व काही वयस्क मंडळी तर बेभान होऊन गेमिंगच्या विळख्यात आजही अडकली आहे. कोणतेच निर्बंध नसल्याने अनेकांना आर्थिक फटकाही बसला आहे. परिणामस्वरूप त्यांचा उमेदीचा काळ दिशाहीन झाला आहे. मोबाईल Online Gaming  गेमिंगमधून मिळणारे उत्पन्न मोठे असले तरी सामाजिक दुष्परिणाम जास्त चिंताजनक असल्याने त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने निर्णायक पाऊल पुढे टाकले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या प्रत्येकाने चांगले व वाईट यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. त्यांना तो लक्षात येत नसेल तर समजूतदार मंडळींनी तो त्यांच्या ध्यानात आणून द्यायला हवा. मोबाईल गेमिंग ‘शॉर्टकट’ने पैसे कमाविण्याचे व मनोरंजनाचेही चांगले साधन आहे, असे यात गुंतलेल्या अनेकांना वाटते. पण, यातून किती जणांचे आयुष्य घडले, असे एकही उदाहरण समोर आलेले नाही. नको तो छंद जोपासून भविष्याची वाताहत करण्यापेक्षा परिश्रमाने आयुष्य घडविण्याचे ध्येय तरुणांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.