भगवान विष्णूचा परमभक्त शेषनागचा मोठा भाऊ आहे. भगवान विष्णू शेष शय्येवर विश्रांती घेतात, असे आपण पुराणात वाचलेच आहे. हे सर्व नाग आपल्या महाकाय आकारासाठीही ओळखले जातात. आता गुजरातमधील कच्छमधील पनान्ध्रो गावातील कोळशाच्या खाणीतून त्याचे जीवाश्म सापडले आहेत. उत्खननादरम्यान शास्त्रज्ञांना सापडलेले जीवाश्म अशा महाकाय प्राण्यांच्या /सर्पाच्या अस्तित्वाची पुष्टी करतात.
शास्त्रज्ञांना सापडलेल्या जीवाश्माची लांबी ११-१५ मीटर आहे आणि त्याची वर्तुळाकारता १७ इंच आहे. यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा नाग आहे. सरासरी २८ अंश सेल्सिअस तापमानात त्याची वाढ झाली होती. शास्त्रज्ञांनी या नागाच्या जीवाष्माला ‘वासुकी इंडिकस’ असे नाव दिले आहे.
आयआयटी रुरकी येथील शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे केवळ प्राण्यांची उत्क्रांतीच नाही तर प्राचीन सरपटणाऱ्या प्राण्यांशी भारताचा असलेला संबंधही उघड झाला आहे. ‘वासुकी’ नागांचा जन्म मूळतः भारतात झाला आणि ते युरेशियातून उत्तर आफ्रिकेत गेले. त्यांचा गोंडवाना सर्पाच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
हा शोधनिबंध ‘नेचर’ मासिकातही प्रकाशित झाला आहे. आयआयटी रुरकी येथील ‘डिपार्टमेंट ऑफ अर्थ सायन्सेस’ चे अध्यक्ष सुनील वाजपेयी यांनी सांगितले की, ‘या सापांची लांबी ३६ फूट ते ४९.२२ फुटांपर्यंत होती. भारतातील हा जीवाश्म कोलंबियाच्या ‘टायटॅनोबोआ’ पेक्षा मोठा आहे, तो डायनासोरच्या काळात आढळून आला होता आणि तो आतापर्यंतचा
सर्वात मोठा सर्प मानला जातो”.
‘वासुकी इंडिकस’ हळू हळू चालत असे आणि शिकार माराच्या टप्प्यात येताच त्याच्यावर हल्ला करून सावज गिळंकृत करीत असे. तसेच त्याच्या हालचाली अगदी अॅनाकोंडासारख्या होत्या. ते सुमारे १२,००० वर्षांपूर्वी नामशेष झाले. ते कासव, व्हेल आणि मगरींच्या प्राचीन प्रजाती खात असावेत, असेही सुनील वाजपेयी म्हणाले.
शास्त्रज्ञांना अशा २७ हाडांचे तुकडे मिळाले आहेत, जे पूर्णपणे सुरक्षित आहेत. विशेष म्हणजे हे जीवाश्म २००५ मध्येच सापडले होते. पण इतर प्रकल्पांना प्राधान्य दिल्याने त्यावर सखोल संशोधन झाले नाही. आधी साऱ्यांना वाटले की हे जीवाश्म मगरीचे आहेत. पण पुन्हा सखोल संशोधन केल्यानंतर इतिहासात त्याची नोंद झाली. आता हा शोध आपल्याला प्रागैतिहासिक (आदिनूतन) कालखंडात म्हणजेच ५.६० ते ३.३९ कोटी वर्षांपूर्वी घेऊन जातो.
मात्र, अद्याप या महाकाय नागाचे डोके सापडलेले नाही. शास्त्रज्ञांचा असा कयास आहे की, आपले डोके एखाद्या उंच ठिकाणी ठेवल्यानंतर स्वतःच्या उर्वरित शरीराला चारही बाजूनी गुंडाळून घेत असावा. त्याचा समावेश मॅडसॉइड सर्प प्रजातींतर्गत करण्यात आला आहे.
त्याच्या पाठीच्या कण्यातील सर्वांत मोठा भाग ४ इंच लांब होता. हे सर्प विषारी नव्हते. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये असाच शाकाहारी डायनासोर सापडला होता, जो १६.७० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता, हे विशेष उल्लेखनीय.