नंदुरबार : नंदुरबार शहर बस स्थानकात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलेला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून 68 हजार 500 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असून, वर्षा कांतीलाल भोसले (वय 38) असे आरोपी महिलेचे नाव आहे. मात्र ती जालना जिल्हयातील असल्याचे सांगितल्याने पोलिसही विचारात पडले आहे.
नंदुरबार शहर बस स्थानकात फिर्यादी यामीनी पाटील (वय 22 वर्षे, रा. ता. जि. नंदुरबार) या दि.10 रोजी दुपारी बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्या महिलेने त्यांच्या गळ्यातील 68 हजार 500 रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या नेतृत्वात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी एक पथक शहर बस स्थानक परिसरात रवाना केले. त्यानुसार पथकांनी बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक संशयित महिला फिर्यादीयांचे मंगळसूत्र चोरी करताना दिसली.
या फुटेजच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेतला असता ती मिळून आली. संशयित महिलेला नाव गाव विचारता तिने तीचे नाव वर्षा कांतीलाल भोसले, वय 38 वर्षे, रा. हसनाबाद, ता. भोकरदन जि. जालना असे सांगितले. तसेच तिने मंगळसुत्र चोरी केले असल्याची कबुली दिली. त्यामुळे आरोपी महिलेकडून एकुण 68 हजार 500 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलीसांना यश आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, स. पो. नि. रविंद्र बागुल सह गुन्हे शोध पथकातील मपोशि/निंबा वाघमोडे, पोशि/हरेश कोळी, ललीत गवळी यांनी ही कारवाई केली आहे.