जळगाव : तालुक्यातील धानवड येथे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोनी चेतन चव्हाण (२२)रा. धानवड ता. जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. सोनी चव्हाण या धानवड येथे आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. तीन वर्षांपासून पती चेतन चव्हाण याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे पती दारू पिऊन विवाहितेला मारहाण करत असे. पतीकडून होणाऱ्या या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने यापुर्वी देखील विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, सोमवारी १७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सोनी चव्हाण यांनी घरी कुणी नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
विवाहितेच्या माहेरच्या लोकांना घटनेची माहिती मिळताच एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी,आमच्या मुलीला गळफास देवून तिला ठार मारण्यात आले आहे असा आरोप केला. तसेच मुलीला ठार मारणाऱ्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मयत सोनी चव्हाण यांच्या पश्चात प्रथमेश (५) सार्थक (३) ही दोन मुलं, आई, वडील, एक भाऊ, लहान बहिण असा परिवार आहे. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Jalgaon Crime News: व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने कवटाळले मृत्यूला
by team
Published On: March 18, 2025 2:15 pm

---Advertisement---