---Advertisement---
जळगाव : सायबर ठग वेगवेगळे अमिषाचे फंडे दाखवित नागरिकांच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारताहेत. टास्क पूर्ण करण्याचे सांगत महिला ठगांनी जळगाव जिल्ह्यातील एका ३२ वर्षीय तरुणीला तब्बल ८ लाख ५० हजार ८०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातत्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही तरुणी खाजगी नोकरी करुन उदरनिर्वाह करते. ८ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी दरम्यान तरुणीच्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर सायबर ठग महिलांनी संपर्क साधला. आरोकिया जेनिटा पी असे नाव सांगत संशयिताने तरुणीशी संपर्क केला. हेड रिजीनल असिस्टंट फॉम एनएसई याठिकाणी पदावर कार्यरत असल्याची तिने बतावणी केली. दुसरी तिच्या सोबतची संशयित महिलेने टेलिग्राम अँडव्हायजर ऐंजलिया व तिच्या सोबतच्या अन्य साथीदारांनी महिलेशी वारंवार संवाद साधत विश्वास निर्माण केला.
टास्कचे आमिष भोवले
एनएसई मर्चन्ट टास्क पुर्ण करण्याचा अफलातून फंडा त्यांनी सांगत भरपूर नफ्याचे अमिष दाखविले. महिलेस जाळ्यात घेतल्यानंतर वेगवेगळ्या टास्कसाठी पैसे भरण्याचा आग्रह केला. महिलेकडून ऑनलाईन पैसे स्विकारत बँक खाते रिकामे केले. त्यानंतर रक्कमेची संशयितांनी महिलेशी संपर्क बंद केला. गुंतवणूक केल्यानंतर कोणत्याही रक्कमेचा महिलेस परतावा मिळाला नाही. पीडित महिलेने संपर्क साधला असता महिला ठगांकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने महिलेने सायबर पोलीस ठाण्यात दाद मागितली. या प्रकरणी तक्रारीनुसार संशयित महिलांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे मंगळवारी (१० फेब्रुवारी) जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे तपास करीत आहेत.
अनोळखीतून फसवणूक
आलेला कॉल ओळखीचा नाही, हे लक्षात आल्यानंतर अनोळखी व्यक्ती फसगत करण्यासाठी वारंवार कॉल करुन तुमच्या ओळखीतीलच आहे, असा आभास बोलण्यातून दर्शवितो. त्यानंतर पुन्हा पुन्हा बोलण्यातून संशयित ठग विश्वास निर्माण करत पैशांची लूट करण्याचे जाळे फेकत असतो. भरपूर पैशांचा लाभ करुन देण्याचे सांगणारी व्यक्ती म्हणजे फसवणूक अटळ असे, वारंवार पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र बोलण्यातून संपर्क वाढत गेल्याने फसवणूक होऊन कष्टाचे पैसे हातातून निघुन जातात. नागरिकांनी अशा कोणत्याही अनोळखींच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच अशा अनोळखी कॉलला प्रतिसाद देवू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.









