---Advertisement---
जळगाव : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच आता जळगावातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेषतः पीडित महिलेने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावरही धमकीचा आरोप केला आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांच्यावरील धमकीच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
---Advertisement---
पीडितेच्या तक्रारीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेला पती पांडुरंग नाफडे हा एका घोटाळ्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी आहे. यामुळे पीडित महिला सीमा नाफाडे हिचा माहेरून पैसे आणावेत, यासाठी गेल्या दीड वर्षांपासून पतीसह सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याची तक्रार पीडित महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे.
रोहिणी खडसेसह कार्यकर्त्यांकडून धमकी
तसेच याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तर ”आम्ही बघून घेऊ”, अशी धमकी रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. या दबावाखाली आतापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती, मात्र आता जीवाला धोका असल्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिल्याचे पीडितचे म्हणणे असून, जर त्यांच्या जीवाला काही झाल्यास खडसे परिवार, नाफडे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते जबाबदार राहील, असेही पीडितचे नमूद केले आहे.
पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश
पीडित महिलेला एक मुलगी असून, तिच्या मुलीसह तिला न्याय मिळावा, अशी मागणी पीडितने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती चाकणकर यांनी दिलीय.