Crime News : एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीसोबत झालेल्या वादातून एका महिलेनं तिच्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला घराच्या छतावरून फेकून दिलं, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून, याबाबत चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिला अंजू देवी आणि तिची बहीण मनिषा या दोघी माहेरी राहतात. कृष्णानगर परिसरात शनिवारी, दोघींमध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात, अंजू देवीने तिच्या ९ महिन्यांच्या मुलाला दोन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकलं.
छतावरून खाली पडलेल्या चिमुकल्याला गंभीर जखम झाल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. यामुळे अंजू देवीच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
तपास दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, अंजू देवीने प्रेमविवाह केला होता आणि ती गेल्या दोन वर्षांपासून माहेरीच राहत होती. तिची मोठी बहीण मनिषादेखील गेल्या दोन महिन्यांपासून माहेरी आली होती. दोघींमध्ये वाद झाल्यानंतर अंजू देवीने आपला राग व्यक्त करत तिच्या मुलाला छतावरून फेकले.
या घटनेबद्दल चिमुकल्याची आजी शोभा देवी यांनी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार अंजू देवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.