Amalner Crime News : अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकासमोर महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न ; पोलिसात तक्रार दाखल

अमळनेर : नगरपरिषदेचे अतिक्रमण निर्मूलन पथक शहरातील सराफा बाजारातील अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. यावेळी या पथकाला महिलांनी शिवीगाळ करत स्वतःच्या अंगावर इंधन ओतून घेत स्वतः ला जाळून घेण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

नगरपरिषद अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. याफिर्यादीनुसार सराफ बाजार परिसरात नागराज भबुतमल चोरडिया यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांना नगरपरिषदेने वेळोवेळी नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे सूचित केले आहे. यानुसार मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी यांनी २४ रोजी सकाळी ११ वाजता नागराज चोरडिया यांनी अतिक्रमण काढायला सुरुवात केली. त्यावेळी नागराज चोरडिया, त्यांची पत्नी इंदुमती चोरडिया, मुलगा प्रदीप चोरडिया, हेमेंद्र चोरडिया, चेतन चोरडिया, सून किरण चोरडिया, वनिता चोरडिया या सर्वानी अतिक्रमण काढण्याच्या कामात अडथळा आणत तुम्ही हे अतिक्रमण काढू शकत नाही असे म्हणत जोरजोरात शिवीगाळ केली.

यावेळी इंदुमती चोरडिया यांनी स्वतःच्या व सूनांच्या अंगावर इंधन ओतून घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. तुम्ही जर अतिक्रमण काढले तर जाळुन घेवून तुमचे नाव टाकून देवू अशी धमकी पथकाला दिली. यावेळी पथकाने चोरडिया कुटुंबाला हे कृत्य बेकायदेशीर असून कारवाई होईल असे सांगून ही त्यांनी शिवीगाळ करणे सुरू ठेवल्याने सदर पथक अतिक्रमण न काढता परतले. शासकीय कामात अडथळा आणुन शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ प्रमोद बागडे हे करीत आहेत.