---Advertisement---
जळगाव : घरासमोर भाजीपाला खरेदी करताना चोरट्यांनी महिलेचा गळ्यातून मंगलपोत चोरून नेली. महिलेने आरडाओरड केल्याने इतर महिला मदतीला धावल्या, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले. शहरातील जीवन नगरात शुक्रवार, ४ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जीवन नगरमध्ये आशा ज्ञानेश्वर महाले (५५) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या कॉलनीतीलच इतर महिलांसोबत घरासमोर भाजीपाला खरेदी करीत होत्या. इतर महिला दुसऱ्या बाजूला होत्या, तर महाले या रस्त्याच्या बाजूने होत्या. त्यांना दोन जण दुचाकीवर येताना दिसले, त्यामुळे बाजूला व्हायला लागल्या त्याच वेळी दुचाकीस्वाराने त्यांना खाली लोटत त्यांच्या गळातील ८५ हजार रुपये किमतीची १७ ग्रॅम वजनाची सोनपोत ओढून घेतली.
त्यात ही महिला खाली कोसळली व माझी पोत चोरली असे सांगू लागल्या. त्या वेळी इतर महिला व भाजीपाला विक्रेता मदतीसाठी तसेच चोरट्यांचा पाठलाग करण्यासाठी धावले. मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार पसार झाले. या प्रकरणी आशा महाले यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.
---Advertisement---