जळगाव : जिल्ह्यातील महिलांसह इतर घटकांची लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शहरासह विशेषतः ग्रामीण भागात प्रशासनाकडून विविध मध्येमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. याकरिता समाजमाध्यम, गाणी, व्हिडीओ रिल्स, पोस्टर्सव्दारे, घरोघरी भेटीं, प्रचार, प्रसिद्धी आवश्यक ते प्रयत्न आदी माध्यमातून जनजागृती केली जात आहे. महिला मतदारांनी लोकसभा निवडणूक मतदानासाठी स्वयंस्फूर्तीने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून जिल्ह्यात तापमान 44 अंशाच्या जवळपास आहे. मे महिन्यात उन्हाची तिव्रता लक्षात घेता सर्व मतदान केंद्रांवर महिला मतदारांसाठी आरोग्य सुविधांसह, अन्य आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे.
सव्वा दोन लाखांहून अधिक महिला मतदान
जिल्ह्यात 20 हजार 55 गर्भवती महिला, 21 हजार 459 स्तनदा माता, यासह 2 लाख 29 हजार 840 महिला मतदार आहेत. यात महिला मतदारांना मतदान असुविधा निर्माण होवू नये, यासाठी विशेषता गर्भार, 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुले असलेल्या तसेच स्तनदा मातांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर, खेळणी यासुविधांसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट, आशा स्वयंसेविका यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच मतदान सकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान पहिल्या टप्प्यात व्हावे यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
महिला बाल कल्याण विभागाचे कर्मचारी तैनात
जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका, बचत गटाच्या महिला या सर्वांना स्वतंत्र ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मतदान करताना महिला मतदारांना कोणतीही असुविधा अडचण येवू नये यासाठी सेविका मदतनीस महिला या पाळणाघरातील मुलांची काळजी घेत सांभाळण्याची जबाबदारी पार पाडणार असून त्यासाठी महिला बाल कल्याण विभागातर्फे 1785 ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रालगत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.
आरोग्य यंत्रणा कार्यान्वित
ग्रामीण तसेच तालुका स्तरावर 53 हजार 857 गर्भवती महिला, 21 हजार 459 स्तनदा माता, आहेत. याशिवाय रक्तदाबाचे 1 लाख 93 272, टीबी 2हजार 366, लेप्रसी 941 आणि एचआयव्ही 301 असे अन्य गंभीर आजारांचे रूग्णांना देखील मतदान करता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह स्थानिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यातील आरोग्य यंत्रणा कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सुविधेसाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर यांनी दिली.