दुर्दैवी! क्रेन डोक्यावर पडल्याने कामगाराचा मृत्यू, जळगावातील घटना

जळगाव : खालून विटा भरलेली क्रेन पाचव्या मजल्यावर जात होती. अचानक ही क्रेन अडकली आणि वेगाने खाली कोसळली. ही क्रेन डोक्यावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही भीषण घटना गुरुवार, ३० रोजी दुपारी ४.१५ वाजेपूर्वी खोटेनगर परिसरात मटण हॉटेलच्या नियोजित सात मजली इमारतीच्या कामावर घडली. मुनेश देवसिंग बोर्डे (वय ३०, ह. मु. रायसोनी नगर) असे मृत कामगाराचे नाव आहे.

मुनेश बोर्डे हा मूळ देवली, ता. रहिवासी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाहः करण्यासाठी तो पत्नी, तीन वर्षांची मुलगी तसेच एक वर्षाचा मुलगा अशा परिवारासह मोहाडी रोडवरील रायसोनी नगरात वास्तव्य करीत होता. त्याचा भाऊ दिनेश दरबार बोर्ड (पावरा) हा एरंडोल येथे कुटुंबासह वास्तव्य करतो. इमारतीच्या बांधकामासाठी त्यालाही जळगाव येथे मुनेश याने बोलवून घेतले होते. हे दोघे भाऊ एकाच साईटवर काम करत होते.

हेही वाचा : कॅफेआड अश्लील चाळे, २२ तरुण-तरुणींना पकडले

दिनेश बोर्ड याच्या माहितीनुसार, खोटेनगर परिसरातील मटण हॉटेलच्या बाजूला सात मजली प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी काल दुपारी क्रेनद्वारे खातून विटा भरून पाचव्या मजल्यावर पोहोचविण्याचे काम सुरू होते. मुनेश हा खालून विटा क्रेनमध्ये भरून देत होता. तर दिनेश बोर्डे व इतर कामगार पाचव्या मजल्यावर क्रेनमधून विटा उतरविण्याचे काम करत होते.

घटनास्थळी पोहोचले पोलीस

माहिती कळताच तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल फेगडे यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका मागवून त्यांनी बेशुद्धावस्थेतील मुनेश याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुनेश याला मृत घोषित केले. डोक्यावरच क्रेन पडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ही वार्ता कळत्यानंतर मयताच्या पत्नीसह इतर भावांना रडू कोसळले. ते शोकमग्न झाले. रुग्णालयातून नातेवाइकांनी ठेकेदाराशी संपर्क साधला असता मोबाइल बंद होता. त्यामुळे बोर्ड कुटुंबातील सदस्य हतबल आणि चिंताग्रस्त होते. देवती या मूळ गावी मृतदेह नेऊन तेथे अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. हवालदार अनिल फेगडे तसेच हवालदार धनराज पाटील यांनी शासकीय रुग्णालयात पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मुनेश याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ तसेच आईवडील असा परिवार आहे. त्याचे आईवडील देवली येथेच वास्तव्य करतात. मुनेश याच्या अकस्मात मृत्यूने त्याचे कुटुंब आजच उघड्यावर आले आहे. रुग्णालयात पत्नीच्या शोकातून याची तीव्रता सर्वोच्या नजरेत आली.