कामे कमी आणि धमक्या जास्त…!

जळगाव महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ नुकताच संपला. नगरसेवक असताना कोणी किती दिवे लावले हे जळगाव शहराच्या परिस्थितीवरून लक्षात येते. नेमकी काय परिस्थिती हे वेगळे सांगायची गरज नाही. खरे तर जळगावकरांच्या शांतता व संयमीपणाला दाद द्यावी लागेल आणि दुसरा विषय म्हणजे विश्वास. काही थोर मंडळी काहीही न करता वर्षानुवर्षे निवडून येत असते. याला कारण त्यांचे कर्तृत्व म्हणता येईल काय? तर तसेही नाही.मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी म्हटले की, मी यापुढे स्वत:च्या प्रचारास फिरणार नाही.

ना बॅनर लावणार ना प्रचार करणार याला म्हणतात हिंमत आणि स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास. अशा व्यक्तिमत्वांच्या विरोधात लढण्यास विरोधकही सतरा वेळा विचार करतात. असे आपल्या येथे कोणी करू शकेल काय? याचे उत्तर नकारात्मकच मिळेल. परवा एका माजी नगरसेवकाने कमालच केली. हा गृहस्थ माजी झाला पण रूबाब किती बघा ना. एकतर नागरिकांची कामे केली नाहीत व आता प्रशासकांनी काही कामे सुरू केली तर संबंधित कामे करणाऱ्या ठेकेदाराला तू या भागात कामे करण्यास कुणाची परवानगी घेतली, अशी विचारणा या नगरसेवकाने केली आणि ठेकेदारास दमदाटी केली. याप्रश्नी संबंधित ठेकेदाराने अखेर पोलीस स्टेशन गाठले. माझ्या वॉर्डात फिरला तर याद राख, अशी धमकी एखाद्या नगरसेवकाने देणे म्हणजे किती कमाल. वॉर्ड म्हणजे आपली मक्तेदारीच, असे हा महाशय समजतो. पोलीस प्रशासनाने याप्रश्नी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

खरं तर असे वर्तन करणाऱ्यांना ‌‘एमपीडीए’ची ‌‘हवा’ दाखवायला हवी. मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना. मध्यंतरी काही भागात रस्त्यांची कामे झाली. महाबळ परिसरातील एका नगरसेवकाने रस्त्यावर उभे राहून स्वत:च्या घरासमोरील कामे करून घेतली, आहे की नाही कमाल. ‌‘नगरसेवक तुपाशी अन्‌‍ कर भरणारी जनता उपाशी’ अशीच परिस्थिती या भागात दिसून येते. अशा व्यक्तिमत्वांना धडा शिकविण्याची वेळ लवकरच येईल आणि एवढ्या धमक्या देऊन दादागिरी करून ही मंडळी विजयी कशी होते? शहरात प्रशासन अतिक्रमणांविरोधात कारवाई करते पण बऱ्याच अतिक्रमणांना नगरसेवकांचे किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांचे अभय आहे. जागा शासकीय व भाडे ही मंडळी घेते…आहे की नाही कमाल… गल्लीबोळातील आबा, दादा, भाऊ असे उद्योग करतात.  शहरातील अनेक कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाची परिस्थिती काय… प्रचंड जलप्रदूषण होत आहे,

पण त्याकडे कुणाचे लक्ष नाही. सांडपाणी तलावात सोडले जाते. तलावातील जैवविविधता यामुळे संकटात आली आहे, परिसरातील पशुपालक आपली जनावरे तलाव परिसरात सोडतात. यासह नजीकच्या शिवाजी उद्यानाची परिस्थिती काय? एकेकाळी हे उद्यान म्हणजे शहराचे वैभव होते. असंख्य पर्यटक येथे येत. त्याकाळी ख्यातनाम चित्रपट निर्माते तथा अभिनेते राजकपूर यांच्या हस्ते त्या उद्यानाचे थाटात उद्घाटन झाले होते. परवा परवा तर मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील रस्ते व गटारीच्या कामाच्या दोन निविदा निघाल्या. असे प्रकार जळगाव महापालिकेतच होऊ शकतात… असा विनोद अनेक जण करत होते. नागरिकांचा असंतोष पाहून आमदार सुरेश भोळे या ठिकाणी पोहोचले.त्यांनी नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत ते याठिकाणी बसले व निवेदन स्वीकारले. या सर्व बाबींचा शहरातील नागरिकांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कामे न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला गेला पाहिजे आणि नव्या शिक्षित व एकही गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींना निवडून दिले पाहिजे. कामे कमी आणि धमक्या जास्त असे वर्तन असणाऱ्यांना  निवडून द्यायचेच नाही, असा निर्धार करायला हवा.