नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषक 2023 स्पर्धेची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. भारतीय संघासह सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एकटा एवढ्या मोठ्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन केले आहे. हे सामने तब्बल 10 स्टेडियमवर होणार आहेत. त्यामुळे या स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी बीसीसीआयने 500 कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक तरतूद करून ठेवली आहे.
कोणत्या स्टेडियमचा होणार कायापालट?
अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, धर्मशाळा, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ आणि कोलकाता येथे विश्वचषकाचे सामने हे होणार आहेत. तर गुवाहाटी व तिरूवअनंतपुरम् येथे सराव सामने होणार आहेत. या सर्व स्टेडियमच्या गरजा पाहून बीसीसीआयने सर्व स्टेडियम उद्यावत करण्याची योजना आखली आहे.
वानखेडे स्टेडियमचे आऊटफिल्ड सुधारणार
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या आऊटफिल्डवर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे आता विश्वचषकाच्या तोंडावर ही आऊटफिल्डसुद्धा बदलण्यात येणार आहे. याचबरोबर मैदानातील एलईडी लाईट्स व कॉरपोरेट बॉक्ससुद्धा अद्ययावात करण्यात येणार आहे. याचबरोबर छत नसलेल्या स्टेडियमवर देखील छत बसवण्यात येणार आहे. पार्किंग स्पेस वाढवण्यात येईल तसेच आसन व्यवस्था देखील बदलण्यात येईल.
चेन्नईमध्ये नवीन खेळपट्टी
चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये दोन लाल मातीच्या खेळपट्ट्या तयार करण्यात येणार आहे. आयपीएलवेळी या खेळपट्टीवर खूप टीका झाली होती. याचबरोबर या स्टेडियमवर नव्या फ्लड लाईट्स लावल्या जाणार असून बाथरूम पासून स्टॅण्ड पर्यंतच्या साफ सफाईवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.