---Advertisement---

दुटप्पी पाकिस्तानला ‘जागतिक’ बत्ती

---Advertisement---

दक्षिण आशियातील भूराजनीती (जिओ-पॉलिटिक्स) जगाच्या इतर भागांपेक्षा वेगळी आहे. ती गुंतागुंतीची तर आहेच, शिवाय दहशतवादाचा प्रादुर्भाव या भागात अधिक आहे. एकीकडे जागतिक स्तरावर अनेक राष्ट्र, दहशतवाद कोणत्याही स्वरूपातला असो, त्याला विरोध करायचा आणि त्याचा नाश करायचा, या मताप्रत आलेली आहेत. भारताचा शेजारी पाकिस्तान मात्र अजून मध्ययुगात आहे. त्याला अजूनही असे वाटते की, दहशतवाद्यांना पोसून, चिथावून आणि हल्ले घडवून आपले काही भले होईल किंवा आपला धाक निर्माण होईल. तशातले काहीही घडत नाही, हे पाकिस्तानचे दुखणे, पहलगामनंतर भारताच्या भूमिकेने त्याचे दुखणे वाढले. तेच त्याने संयुक्त राष्ट्रांसमोर मांडले तर तेथेही त्याला बत्ती दिली गेली. भारताकडून आपली कोंडी केली जात असून, त्यामुळे प्रादेशिक स्थिरता व शांतता धोक्यात येईल, असा पाकिस्तानचा कांगावा होता. पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तान, त्यापूर्वी भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याच देशाचा हात आणि तरीही आमचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आम्ही लढत राहण्याच्या बाता हा केवढा मोठा शहाजोगपणा। पण, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत १५ पैकी १३ सदस्यांनी भारताला पाठिंबा दिला आणि त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा जगात नाचक्की झाली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा भारतीय उपखंडाच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका असल्याचे पाकिस्तान वगळता साऱ्या दुनियेला मान्य आहे. पहलगामचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत आहेत, हेही सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच नद्यांचे पाणी रोखणे, आयातबंदी, रस्तेबंदी अशी अनेक पावले भारताने पाकिस्तानच्या विरोधात उचलली. या पृष्ठभूमीवर संयुक्त राष्ट्रांमध्ये जे घडले ते ऐतिहासिक होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पंधरापैकी तेरा सदस्यांनी भारतासोबत एकजुटीने उभे राहून पाकिस्तानचे ढोंग थेट उघडेच पाडले. अशा लाजिरवाण्या परिस्थितीतही सुधारणा करण्यास किंवा माघार घेण्यास पाकिस्तान तयार दिसत नाही. सार्वभौमत्वाची पुंगी वाजविणे सुरूच आहे.

थोडे मागे वळून पाहिले तर असे दिसते की, तीन ते दशकांपासून भारत सातत्याने पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे कुठल्या ना कुठल्या संघर्षात ओढला जातोय. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनापासून ते २००८ मध्ये मुंबईतील हल्ला आणि पुलवामा ते पहलगामपर्यंतच्या भयंकर हल्ल्यांपर्यंत, दहशतवादाला पाठिंबा देण्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावेच भारताकडे आहेत. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन एकदा म्हणाल्या होत्या, “आपण घरात साप पाळत असू तर ते केवळ शेजान्यांना चावतील अशी अपेक्षा करू शकत नाही… ते तुम्हालाही चावू शकतात…” दहशतवादी सापांनी भारताचे चावे घेतलेच, पण पाकिस्तानलाही सोडलेले नाही. दहशतवादाचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि हिजबुल मुजाहिदीनसह ८० हून अधिक ज्ञात दहशतवादी संघटना आहेत. त्यातील बऱ्याच संघटनांना तिथल्या सरकारचे थेट वा अप्रत्यक्ष समर्थन आहे. त्यामुळेच दहशतवादी माजले आहेत. पहलगाममध्ये त्यांनी जे निघृण हत्याकांड घडविले, ते पणूंनाही लाजवेल एवढे भयंकर होते. त्यामागे जनरल मुनीरचे डोके होते, असे जाहीरच म्हटले जातेय.

आयएसआयकडेही बोट दाखविले जातेय. अशा स्थितीत आत्मपरीक्षण करण्याऐवजी, सुधारणा करण्याऐवजी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे हस्तक्षेपाची मागणी केली. पण, शेवटी पाकिस्तानच तोंडघशी पडला. १५ पैकी १३ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य केवळ भारताच्या पाठीशी उभे राहिले नाही, तर सीमापार दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानला फटकारलेही गेले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पहलगाम हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला आणि दोन्ही राष्ट्रांना संयमाची गरज असल्याची आठवण करून दिली. त्यांचाही संदेश स्पष्ट होता की, पाकिस्तानने ओरडण्यापूर्वी स्वतःचे घर व्यवस्थित करावे. अशातही बेशरमपणाची हद्द म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची भूमिका आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाभोवती केंद्रित होती. ओसामा बिन लादेनला आश्रय देणार पाकिस्तान, दाऊद इब्राहिमला सांभाळणार पाकिस्तान, हाफिज सईदची काळजी घेणार पाकिस्तान, भारतात हल्ले घडवणाऱ्यांना मदत करणार पाकिस्तान, प्रोत्साहन देणार पाकिस्तान… आणि तरीही सार्वभौमत्वावर उच्चारवाने नारे देणार पाकिस्तानः भारताने स्वतःहून कधीही पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप केला नाही. मात्र, आपल्या देशावर हल्ले झाले तर सर्जिकल स्ट्राईक करताना मागेपुढेही पाहिले नाही.

भारताने आक्रमक म्हणून नव्हे तर आपल्या लोकांचे, आपल्या सीमांचे आणि आपल्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी कारवाया केल्या. पाकिस्तानला आपल्या सीमांचे रक्षण करण्याचा अधिकार असेल, तर भारताचा स्वसंरक्षणाचा अधिकार आणि त्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार अमान्य कसा करता येईल? दहशतवादाचा वापर स्टेट पॉलिसी अर्थात देशाचे धोरण म्हणून जो देश करीत असेल, त्याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात सहानुभूती असण्याचे कारण नाही. त्यामुळेच भारताला जगातून मिळणारा पाठिंबा सतत वाढतोप आणि पाकिस्तानची वाटचाल वेगाने बहिष्कृत राष्ट्र म्हणून कुख्यात होण्याच्या दिशेने सुरू आहे. पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने सिंधू करार स्थगित केला. धरण बांधणी आणि पाणी वळवण्याचे प्रकल्प जलद गतीने सुरू केले. त्यामुळे पाकिस्तानला अब्जावधी घनमीटर पाण्यापासून वंचित राहावे लागेल. भारताने सीमा बंद केल्या, व्यापार बंद केला. ही पावले म्हणजे युद्ध नव्हे, ती धोरणात्मक पावले आहेत आणि नैतिकतेच्या व आंतरराष्ट्रीय शांततेच्या नावाखाली पाकिस्तानचा आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही, याचा तो इशाराही आहे. भारत-पाक संबंधातील तणावाच्या केंद्रस्थानी एक ऐतिहासिक वास्तव आहे आणि ते असे की, आपल्यासोबत स्वतंत्र झालेला हा देश प्रगत जगाच्या बरोबरीने प्रगती करतोय आणि आपण निव्वळ रांगतोय, ही पाकिस्तानची भावना आहे.

या भावनेला त्या देशात राजकीय, सांस्कृतिक, व्यावहारिक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संस्थात्मक अधिष्ठान मिळालेले आहे. शालेय पाठ्यपुस्तकांपासून ते धर्मगुरूंच्या प्रवचनांपर्यंत भारत विरोध हेच पाकिस्तानचे जीवनध्येय आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय भारताला शाश्वत शत्रू मानतात, तसे दाखवितात आणि मलिदा खातात. लोकांना खायला अन्न नाही, पण त्यांचे संरक्षणाचे बजेट फुगत असते. जोपर्यंत लोकनिर्वाचित सरकार शांततेत, शहाणपणाने व व्यावहारिक निर्णय घेण्याच्या स्थितीत येत नाही, तोवर हे असेच चालत राहणार आहे. आणि ते असेच चालत राहणार असेल तर भारताला आणि जागतिक समुदायालाही जशास तसे वागावे लागणार आहे. आता जागतिक समुदायाने हेही लक्षात घेतेल पाहिजे की, दहशतवादाला समर्थन हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय धोरणाचा भाग आहे. बंद दरवाज्याच्या मागे दहशतवाद्यांशी बोलायचे, त्यांना पोसायचे आणि जागतिक समुदायासमोर दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तान जगाच्या बरोबर आहे, असे सांगायचे असा हा दुटप्पी देश. त्याचा भारतविरोध वारंवार उफाळून येतो आणि कधी पुलवामा तर कधी पहलगाम घडते. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारू लागली. अशा स्थितीत पहलगामचा हल्ला झाला. त्यामागे पाकिस्तानचा हात आहेच. एकीकडे काश्मिरींच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही लढतोय असे म्हणायचे आणि त्याच काश्मिरी लोकांच्या कल्याणात अडथळे आणायचे हाही पाकिस्तानी दुटप्पीपणा. पाकिस्तानच्या भूमीवर शेवटचा दहशतवादी जिवंत असेपर्यंत त्याने सार्वभौमत्वाच्या बाता करू नयेत. जिथे लोकशाहीच नावापुरती आहे, तिथे सार्वभौमत्वाच्या चिंधड्या उडणारच. त्या पाकिस्तानात उडाल्या आणि उडतच आहेत. या स्थितीत आपल्या देशातील निष्पापांचे जीव घेतले जात असतील तर सार्वभौमत्वाच्या किंवा नैतिकतेच्या गप्पा विसरून शत्रूचा गळा आवळणे हाच राजधर्म आहे आणि त्याच धर्माचे पालन भारत करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment