---Advertisement---
२० मार्च निमित्त चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृतीची गरज; घटती संख्या चिंतेचा विषय
दरवर्षी २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. २०१० मध्ये नेचर फॉरेव्हर सोसायटी ऑफ इंडिया आणि Eco-Sys ॲक्शन फॉउंडेशन यांच्या पुढाकारातून या दिवसाची सुरुवात झाली. या दिवसामागील मुख्य उद्देश म्हणजे चिमण्यांचे संवर्धन, शहरी भागातील पक्ष्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण संतुलनाचे महत्त्व पटवून देणे.
एकेकाळी घराच्या अंगणात, छपरांवर सहज दिसणारी चिमणी आज दुर्मिळ होत चालली आहे. वाढते शहरीकरण, काँक्रीटीकरण, ध्वनीप्रदूषण आणि अन्न-पाण्याची कमतरता ही यामागील प्रमुख कारणे मानली जातात. चिमण्यांची झपाट्याने घटणारी संख्या ही पर्यावरणासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध ठिकाणी पेंटिंग स्पर्धा, जनजागृती मोहीम, तसेच चिमण्यांसाठी घरटी तयार करण्याचे उपक्रम राबवले जातात. नागरिकांनी आपल्या घराजवळ पाण्याची भांडी ठेवणे, धान्य टाकणे आणि लहान घरटी बसवणे अशा छोट्या उपाययोजना केल्यास चिमण्यांचे संरक्षण शक्य आहे.
२०१७ मध्ये नरेंद्र मोदी यांनीही “चिमणी वाचवा” मोहिमेला पाठिंबा देत जनजागृती केली होती. तसेच चेन्नईतील कूदूगल ट्रस्ट या संस्थेने शालेय मुलांच्या मदतीने हजारो चिमणी घरटी तयार करून संवर्धनात मोलाची भूमिका बजावली आहे.
तज्ज्ञांच्या मते, चिमणी ही केवळ एक पक्षी नसून पर्यावरण संतुलन राखणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
“चला, छोट्या छोट्या कृतीतून चिऊताईचे जीवन वाचवूया आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडूया!”









