मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली. जनतेनं महायुतीला कौल देत भरघोस यश त्यांच्या पदरी पाडलं. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला.
महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच आता मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यानंतर आता भाजपचे नेते- कार्यकर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिली पसंती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले असून या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यातील पहिला फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी 2-2-1 अशा फॉर्म्युलावरही चर्चा सुरु आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत देवेंद्र फडणवीसांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत असून आता नवनिर्वाचित पाच अपक्ष आमदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. या पाच नवनिर्वाचित अपक्ष आमदारांमध्ये अशोकराव माने, रवी राणा, शिवाजी पाटील, रत्नाकर गुट्टे,विनय कोरेआणि यांचा पाठिंबा आहे.