मुंबई संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल बद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंगळवारी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला ईमेल लिहून पुढील हंगामापासून त्याचा राज्य क्रिकेट संघ मुंबईहून गोव्यात बदलण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितलेआहे.
यशस्वीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता मुंबई क्रिकेट संघाकडून खेळायचे नाही आणि तो २०२५-२६ च्या पर्वात गोवा संघाकडून खेळण्यास इच्छुक आहे. तो अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड सारख्या खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

”वैयक्तिक कारणामुळे गोवा स्थायिक होत असल्याचं कारण देत त्याने त्या राज्याच्या संघाकडून खेळण्याची परवानगी मिळाली, यासाठी मेल केला आहे,”असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेस व टाईम्स ऑफ इंडियानेही या बाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्याला गोवा संघाकडून खेळायचे आहे आणि कदाचित तो नेतृत्व करतानाही दिसणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळू नयेत म्हणून देशांतर्गत सामने खेळण्याचे निर्देश दिले तेव्हा जयस्वाल गेल्या हंगामात मुंबईकडून खेळला होता. त्याने जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केलेहोते.
या वर्षाच्या सुरुवातीला, जयस्वालचा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समावेश नव्हता परंतु त्याला नॉन-ट्रॅव्हल राखीव यादीत समाविष्ट केले गेले. १७ फेब्रुवारी रोजी विदर्भाविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी जयस्वालचा पुन्हा मुंबई रणजी संघात समावेश करण्यात आला. तथापि, त्याने घोट्याच्या दुखण्यामुळे सामन्याच्या आदल्या दिवशी सामन्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला.
जयस्वाल त्याच्या अंडर-१९ दिवसांपासून मुंबईसाठी खेळत आहे आणि काही हंगामांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी द्विशतक झळकावल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. दोन वर्षांपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही.