यावल : तालुक्यातील एका गावातील दुकानदाराकडून अन्न औषध खात्याचे अधिकारी असल्याची बतावणी करीत ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल तालुक्यातील चिंचोली गावातील भवानी पेठमध्ये संतोष हरी बडगुजर यांचे किराणा दुकान चालूवून आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या दुकानात ७ जुलै रोजी आकाश भगवान जावरे (२९ , रा.आंबेडकर चौक, नंदुरबार) व राहुल श्रीहरी काळे (४३, रा.कात्रज, पुणे) हे दोघे आले. आम्ही अन्न,औषध खात्याचे अधिकारी आहोत, तुम्ही विमल गुटखा विकतात म्हणून तुमच्याविरुद्ध कारवाई करायची आहे. तुमची पत्नी आणि मुलगा यांना अटक करायची आहे, असे सांगून त्यांना धमकविले. तुम्हाला अटक टाळायची असेल तर दोन लाख रूपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. संबंधित दुकानदाराने त्यांना ५० हजार रुपये दिल्यानंतर ते तिथून निघून गेले. त्यानंतर दोघे पुन्हा शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी गावात येऊन त्यांनी परत दुकानदाराकडे पैशांची मागणी केली. परंतु, दुकानदाराकडे गुटखा नसल्याने त्याने गावातील होमगार्ड संजय साळुंखे यांना माहिती दिली. यावल पोलिसांना बोलवण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार वासुदेव मराठे, जाकिर तडवी, राहुल अहिरे हे पथकासह दाखल झाले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले व यावल पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दुकानदार संतोष बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.