यावल : तालुक्यातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपविली. हि घटना थोरगव्हाण येथे शुक्रवारी घडली. स्वप्निल देवीदास चौधरी (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पत्नी दुसऱ्या खोलीत असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्वप्निल चौधरी हा थोरगव्हाण येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. शुक्रवार, ३० रोजी त्याने पत्नी पूनम हीस वेफर तळून मागितले होते. पत्नी किचनमध्ये वेफर्स करत असताना दुसऱ्या खोलीत त्याने आत्महत्या केली. पूनम ही चिप्स द्यायला गेली असता हा प्रकार उघड झाला.
यावेळी पूनमने एकच हंबरडा फोडला. स्वप्निल याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विजय नवल चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वप्निल या तरूणाने आत्महत्या नेमकी का केली यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.