---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवसांपासून यलो अलर्ट कायम ठेवला असून, २५ मेपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
दुसरीकडे मान्सून देखील केरळच्या उंबरठ्यावर दाखल झाला असून, काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मान्सून काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
---Advertisement---
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभ क्षेत्र प्राधिकरण कडा गणेश भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नरवीर रावळ, उपआयुक्त महानगरपालिका गणेश चाटे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अदिती कुलकर्णी, शहर अभियंता मनीष अमृतकर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहायक नासिदूल इस्लाम आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणातून विसर्ग नियंत्रित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूर निवारणासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नद्यांमधील गाळ तात्काळ काढून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी, अशी सूचनाही देण्यात आली. नदीवरील पूल सुरक्षित राहतील यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले.