मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन यांचं रविवारी गुजरात येथे निधन झालं. गुजरात येथील उमरगाव येथे ते ‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी गेले होते. पण तेव्हाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका झाल्याने त्यांचं अकस्मात निधन झालं.
नेमकं काय घडल?
शनिवारी संध्याकाळी शूटिंगची शिफ्ट संपताना योगेश यांना प्रकृती अस्वस्थ असल्याचे जाणवले. त्यामुळे ते डॅाक्टरांकडे गेले आणि औषधे घेतली. रात्री हॅाटेलमधील रुममध्ये झोपले, पण रविवारी सकाळी शूटिंगसाठी सेटवर पोहोचले नाहीत. त्यानंतर टिममधील लोकांनी त्यांना बरेच कॅाल केले, पण त्यांनी कॅाल रिसिव्ह केला नाही. अखेर हॅाटेलचा दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडवरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
योगेश महाजन यांचा अल्प परिचय
मूळचे जळगावचे असलेल्या योगेशचा जन्म सप्टेंबर १९७६मध्ये शेतकरी कुटुंबात झाला होता. अभिनयात कोणताही गॅाडफादर नसताना त्यांनी स्वबळावर मराठी, हिंदी आणि भोजपुरी मनोरंजन विश्वात आपले नाव कमावले.
मनोरंजन विश्वाकडे वळण्यापूर्वी ते भारतीय सैन्यात होते. भोजपुरीमधून त्यांची अभिनयात एन्ट्री झाली. ‘मुंबईचे शहाणे’, ‘संसाराची माया’, ‘हिरवं कुंकू’ आदी मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. आता त्यांच्या अशा अचानक मृत्यूने प्रेक्षकांना धक्का बसलाय. तर कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जातेय.