तुम्ही फसवणुकीचा नवा प्रकार शोधला, आरक्षण मागणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

---Advertisement---

 

नवी दिल्ली : स्वतःला बौद्ध अल्पसंख्यक असल्याचा दावा करून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण मागणाऱ्या दोन उमेदवारांना तुम्ही तर, फसवणुकीचा नवा प्रकार शोधला अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सुनावणीत न्यायासनाने म्हटले की, तुम्ही खऱ्या अल्पसंख्यकांचे हक्क हिरावून घेऊ पाहत आहात. तुम्ही देशातील सर्वांत समृद्ध, सुविधा-संपन्न आणि उच्च जातीय समुदायांपैकी एक आहात. अशा लोकांनी प्रत्यक्षात वंचित असलेल्या समाजांचे अधिकार काढून घेणे गुन्हा आहे. दोन्ही उमेदवार हरयाणातील समृद्ध जाट समाजातून येतात. लेखी परीक्षेपूर्वी या उमेदवारांनी स्वतःला सामान्य प्रवर्गातील सांगितले होते, मात्र आता बौद्ध अल्पसंख्यक असल्याचा दावा केला.

सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारले, ‘पूनिया’ हे आडनाव जाट समाजातही आहे आणि अनुसूचित जातींमध्येही. तुम्ही नेमके कोणते ‘पूनिया’ आहात, वकिलांनी उत्तर दिले की, त्यांचे पक्षकार जाट आहेत. त्यावर न्यायालयाने प्रश्न केला, मग तुम्ही अल्पसंख्यक कसे ठरलात, वकिलांनी धर्मांतर केल्याचे सांगत ते संविधानिक अधिकार असल्याचा युक्तिवाद केला, यावर न्यायासनाने त्याला फटकारले.

युक्तिवादावर सरन्यायाधीश संतप्त

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी बचाव करत, आम्ही प्रामाणिकपणे बौद्ध धर्म स्वीकारला आहे, असे म्हटल्यावर सरन्यायाधीशांनी इशारा दिला की, आम्हाला पुढील कठोर टिप्पणी करायला भाग पाडू नका. असा युक्तिवाद मान्य केला तर सर्वच लोक हेच करू लागतील. उच्च जातीय लोक धर्मांतर करू लागतील आणि खऱ्या गरजूंचे अधिकार हिरावून घेतील.

काय आहे प्रकरण?

मेरठमधील सुभारती वैद्यकीय महाविद्यालयात बौद्ध अल्पसंख्यक समुदायासाठी आरक्षण आहे. निखिल कुमार पूनिया आणि एकता या दोन उमेदवारांनी नीट-पीजी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात या अल्पसंख्यक कोट्यातून प्रवेशाची मागणी केली. आपण बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा करीत त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जारी केलेले प्रमाणपत्रही सादर केले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---